मुंबई : मालाडमधील सुमारे ५५० मीटर लांब आणि १८.३० मीटर रुंद अशा शंकरलेन रस्ता रुंदीकरणात एकूण ३५७ बांधकामे अडसर ठरत आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी लवकरच ही बांधकामे महापालिकेतर्फे हटविण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, प्रकल्पबाधित झालेल्या ६४ कुटुंबांना लवकरच सदनिका देण्यात येणार असून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्याहस्ते सोमवारी प्रकल्पबाधितांना घरांचे चावीवाटप करण्यात आले.
मालाड पश्चिम येथील शंकर लेन (मिसिंग लिंक) रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या रहिवाशांना पर्यायी पुनर्वसनाअंतर्गत पीएपी सदनिका वितरण कार्यक्रम महापालिकेच्या पी उत्तर विभाग कार्यालयात पार पडला. त्यावेळी पीयूष गोयल यांनी महापालिका अधिकाऱ्यांना विविध आदेश दिले. महापालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांना वेग देण्यात यावा, तसेच प्रकल्पबाधितांना घरे दिली जात असताना मोकळ्या झालेल्या जागेवर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश गोयल यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
उत्तर मुंबईतील झोपडीधारकांना शक्यतो त्याच विभागात सुसज्ज घरे मिळावीत, असा गेल्या वर्षी सामूहिक संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार, शंकर लेन येथील प्रकल्पबाधितांना उत्तम दर्जाची घरे मिळाली आहेत. तीन टप्प्यात होणाऱ्या या रस्त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. तसेच या भागात पाणी तुंबण्याचीही समस्या उद्भवणार नाही, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. या प्रकल्पाचे तीन टप्प्यात होणारे काम एकामागोमाग न करता एकाचवेळी पूर्ण करावे, अशीही सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची अनेक कामे अपूर्ण असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच काही ठिकाणी रस्ते अस्वच्छ असून काही ठिकाणी रस्त्यांचे योग्य सपाटीकरण झाले नसल्याच्या समस्येकडे त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्याच्या योजनेनुसार उत्तर मुंबईतील रहिवाशांनी त्यादृष्टीने आपल्या इमारतीचा स्वतःच पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात विकासक अडथळे आणत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही गोयल यांनी दिला. मालवणी परिसरात अनधिकृत बांधकामे उभी राहणार नाहीत, त्यावरही करडी नजर ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.