मुंबई : शिंदेगटात गेलेल्यांना नैराश्य आले आहे. त्यांची गळचेपी होतेय असे त्यांचे म्हणणे आहे. याच्या-त्याच्याकडे निरोप पाठवून परत घेण्याची मागणी करीत आहेत. पण त्यांची जागा आता अन्य शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांना तिकीट मिळणे शक्य नाही. परत घ्यायचेच असेल तर तुम्हा शिवसैनिकांना मान्य असेल तरच, तुम्ही जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत त्यांना घेणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परतणाऱ्यांचा निर्णय शिवसैनिकांवर सोपवला.

शिवसेनेच्या (ठाकरे) शाखाप्रमुखांपासून विभागप्रमुखांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवन येथे पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले. विजयी होणार या आत्मविश्वासाने निवडणुकीची तयारी करा. ही निवडणूक म्हणजे आपली ॲसिड टेस्ट आहे. १९९७ पासून महापालिका निवडणुकांची जबाबदारी आली तेव्हापासून प्रत्येकवेळी मला अनेकांनी ही निवडणूक तुमच्यासाठी ॲसिड टेस्ट आहे, हे सांगण्यास सुरुवात केली. प्रत्येक निवडणूक ही ॲसिड टेस्टच असायची पण केवळ शिवसैनिकांच्या, तुमच्या भरवशावर आपण आत्मविश्वासाने जिंकत आलो. त्याच आत्मविश्वासाने याही निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे.

सत्ताधाऱ्यांना मला संपवायचे आहे

सत्ताधारी कालच्या मेळाव्यातही बोलले, त्यांनी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला लक्ष्य केले नाही. त्यांचे लक्ष्य केवळ उद्धव ठाकरे हाेते. त्यांना ठाकरे ब्रँड संपवायचा आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी ॲसिड टेस्ट आहे. याआधी अशा ॲसिड टेस्टच्या काळात आपण १०३ पर्यंतचा आकडा गाठला आहे याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे त्या आत्मविश्वासानेच लोकांसमोर जा. त्यांना महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे सांगा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

मनसे सोबतच्या युतीचे माझ्यावर सोडा, आपली तयारी २२७ जागांची!

२० वर्षांनी आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो. सर्वांना आनंद झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी येऊन भेटत आहेत, काय करणार आहात विचारत आहेत. त्याचे काय करायचे ते माझ्यावर सोडा. ते आपण नंतर ठरवणारच आहोत. पण आपली तयारी ही २२७ जागांची म्हणजे १०० टक्के असायलाच हवी. आपल्यासमोर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांनी समोर ठेवलेले ध्येय आपल्याला साध्य करायचे आहे. कितीही संकटे आली तरी आपला आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्या आत्मविश्वासानेच आपल्याला लोकांसमोर जायचे आहे. पूर्ण ताकदीने आपल्याला विजय मिळवायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.