मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’ मेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर पुलाला (कर्नाक) पदपथ आहेत की नाहीत असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण झाले, पण या पुलाच्या पदपथांसाठी मात्र पादचाऱ्यांना वाट बघावी लागणार आहे. या पुलाच्या पदपथाची रचना ही गुंतागुंतीची असून पुलाच्या फक्त पूर्व दिशेच्या पोहोच रस्त्याला पदपथ आहेत, तर पश्चिमेकडच्या पोहोचरस्त्यावर पदपथ देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना पुलावरून चालताना सलग चालता येणार नाही तर जिन्याने खाली उतरून मग स्लिप रोडवरून चालावे लागणार आहे. मात्र पादचाऱ्यांना याकरीता अजून दोन – तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबई महापालिकेने आतापर्यंत बांधलेले पूल हे विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. मशीद बंदर स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या कर्नाक पुलाची पुनर्बांधणी मुंबई महापालिकेने केली असून या पुलाचे सिंदूर असे नामकरण करण्यात आले आहे. सिंदूर पूल गुरुवारी १० जुलैपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र यापूर्वीच्या पुलाप्रमाणेच या पुलावर पदपथासाठी पादचाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. मात्र या पुलाच्या पदपथाची एक वेगळीच कहाणी आहे.
मध्य रेल्वेच्या रुळांवरून जाणाऱ्या या पुलाच्या रेल्वेरुळावरील भागात पदपथ आहेत. तसेच पूर्व दिशेला पोहोच रस्त्यावर पदपथ देण्यात आले आहेत. मात्र पश्चिम दिशेला पोहोच रस्त्यावर पदपथ नाहीत. पूर्वेकडून पी डिमेलो रोडकडून पुलावर चालत येणाऱ्या पादचाऱ्यांना रेल्वे रुळांचा भाग ओलांडल्यावर जिन्याने खाली उतरावे लागणार आहे. खाली उतरल्यानंतर पुलाच्या बाजूला दिलेल्या मार्गावरून पादचाऱ्यांना चौकापर्यंत येता येणार आहे. त्यामुळे सिंदूर पुलावर फक्त अर्ध्या पुलावर पदपथ बांधण्यात आलेले आहे.
दरम्यान, सिंदूर पुलाच्या बाजूने स्लिप रोड तयार करण्यात आले असून त्यावरून पादचाऱ्यांना चालावे लागणार आहे. पूर्व दिशेला पुलाच्या खाली एक स्लीप रोड आहे. पूर्व बाजूला सीएसटी स्थानकाच्या दिशेच्या बाजूची जमीन रेल्वेची असल्यामुळे तिथे स्लिप रोड दिलेला नाही. तर पुलाच्या पश्चिम दिशेला दोन्ही बाजूने पादचाऱ्यांसाठी स्लिप रोड देण्यात आले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना या पदपथांवर चालताना जिन्यांने चढ-उतार करावे लागणार आहे.
लोअर परळ आणि गोखले पुलालाही नंतर पदपथ
लोअर परळ पूल आणि अंधेरीचा गोखले पूल या दोन्ही पुलांना पदपथ देण्यात आले नव्हते. मात्र नागरिकांनी मागणी केल्यानंतर या दोन्ही पुलांवर पादचाऱ्यांसाठी अरुंद अशा पायवाटेची सोय करण्यात आली. अंधेरीतील गोखले पुलावर अवघा १ मीटर रुंदीचा चिंचोळा पदपथ देण्यात आला. तर लोअर परळ पुलावरही अशीच अरुंद पायवाट दिली आहे.
दोन – तीन महिने वाट बघावी लागणार
पोहोच रस्त्यावरील पदपथ तयार असले तरी अद्याप पुलाखालील स्लीप रोड आणि उतरण्यासाठी जिने यांचे काम बाकी असून येत्या दोन महिन्यात ही कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य आहे. त्यांनंतरच या पदपथांचा वापर करता येणार आहे. पश्चिम दिशेला पदपथ दिलेले नाहीत, कारण उड्डाणपूल हा थेट चौकात उतरतो. वाहनांची वर्दळ इथे जास्त असल्यामुळे पादचाऱ्यांसाठी ते गैरसोयीचे ठरले असते.
अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त