मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या दहावीच्या (एसएससी) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत महानगरपालिकेच्या २४७ माध्यमिक शाळांमधून एकूण १४ हजार ९६६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १३ हजार ९०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पालिका शाळेचा दहावीचा सरासरी निकाल ९२.९२ टक्के इतका लागला आहे. तसेच, ८९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून ११८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

वरळी सी फेस महानगरपालिका माध्यमिक शाळेमधील अक्षरा अजय वर्मा या विद्यार्थिनीने ९६.८० टक्के गुण मिळवून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. गजधर पार्क माणेकजी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी नंदिनी शगुनलाल यादवने ९६.२० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच गुंदवली मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेतील सेजल शेर बहादूर यादव या विद्यार्थिनीने ९५.६० टक्के गुण प्राप्त करीत तिसरा क्रमांक पटकावला. गतवर्षी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणारे एकूण ६३ विद्यार्थी होते. तर यंदा ११८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.

महानगरपालिकेच्या शाळेचा मार्च २०२३ मध्ये ८४.७७ टक्के, मार्च २०२४ मध्ये ९१.५६ टक्के तर या वर्षी म्हणजेच मार्च २०२५ मध्ये ९२.९२ टक्के इतका निकाल लागला आहे. मागील वर्षी ७९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. यावर्षी त्यात १० शाळांची भर पडली असून ८९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त प्राची जांभेकर यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेतली होती. दहावीच्या परीक्षेच्या धर्तीवर शालेय स्तरावर सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या होत्या.

निकाल वाढीसाठी पालिकेने केल्या या उपाययोजना

महानगरपालिकेने स्वतःची ‘मिशन मेरिट’ सराव पुस्तिकेची निर्मिती केली आहे. ज्याची विद्यार्थ्यांना अध्ययनात अधिक मदत मिळते. विद्यार्थ्यांचा सराव होण्याकरिता शिक्षणमंडळाच्या धर्तीवर शालेय स्तरावर दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात येतात. सर्व अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देवून मार्गदर्शन करण्यात येते. दरमहा दत्तक अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभा घेण्यात येतात. निकालवृद्धीबाबत शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. शिक्षणमंडळाच्या नियमकांची व्याख्याने आयोजित केली जातात. विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षणीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय साधून वेळोवेळी निकालवृद्धीसाठी सभा घेण्यात येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर सीबीएसई शाळेचा निकाल ८२ टक्के

महानगरपालिकेने २०२०-२१ मध्ये के पूर्व विभागात मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर ही सीबीएसई मंडळाची शाळा सुरू केली. या शाळेत सीबीएसई मंडळाच्या नियमावलीनुसार अभ्यासक्रम सुरू आहे. या शाळेत २०२४-२५ मध्ये इयत्ता १० वीचा वर्ग होता. या शाळेतील एकूण ३८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होते. त्यापैकी १३ विद्यार्थी ८० टक्क्यांहून अधिक श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मिशबाह फारुखी या विद्यार्थिनीने ९१ टक्के गुण प्राप्त केले आहेत.