मुंबई : उपनगरीय रुग्णालयामध्ये मागील पाच वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या १८० डीएनबी डॉक्टरांना मुंबई महानगरपालिकेकडून कोणतीही वेतनवाढ देण्यात आली नाही. त्याचबरोबर भविष्यनिर्वाह निधीची सुविधा न देणे, कमी अनुभवी डॉक्टरांच्या हाताखाली नियुक्ती, सेवेतून कमी करण्याची टांगती तलवार डोक्यावर ठेवून महानगरपालिकेकडून त्यांना मानसिक त्रासही दिला जात आहे. याबाबत महानगरपालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. वेतनवाढ व मानसिक ताणामुळे या डीएनबी डॉक्टरांनी काम सोडल्यास उपनगरीय रुग्णालयातील रुग्णसेवेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेने डीएनबी शिक्षक वर्ग १ आणि डीएनबी शिक्षक वर्ग २ पदासाठी २०२० मध्ये पदव्युत्तर आणि कमीत कमी १२ वर्षाचा अनुभव असलेल्या डाॅक्टरांची मुलाखत घेतली. यातील १७५ पात्र डॉक्टरांची निवड करण्यात आली. या डॉक्टरांना मासिक दोन लाख रुपये मानधन देऊन त्यांची पालिकेच्या विविध उपनगरीय रुग्णालयामध्ये २०२१ पासून कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी, कांदिवली शताब्दी, व्ही.एन.देसाई, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगवती रुग्णालय अशा उपनगरीय रुग्णालयांमध्ये या डीएनबी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीनंतर या रुग्णालयातून केईएम, शीव, नायर व कूपर या रुग्णालयांमध्ये रुग्ण हस्तांतरित करण्यात घट झाली. अनेक अवघड व किचकट शस्त्रक्रिया उपनगरीय रुग्णालयात होऊ लागल्या. डीएनबी डॉक्टर बाह्य रुग्ण विभागामध्ये दररोज ३५ पेक्षा अधिक रुग्णाची तपासणी करत असल्यामुळे केईएम, शीव, नायर व कूपर या तृतीय श्रेणीतील रुग्णालयांवरील भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली. रुग्णसेवा करण्याबरोबरच डीएनबी डॉक्टरांवर शिकाऊ डॉक्टरांना शिकविण्याचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल.
उपनगरीय रुग्णालयांमधील रुग्णसेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कंत्राटी डीएनबी डॉक्टरांना मुंबई महानगरपालिकेकडून पाच वर्षांत एकदाही वेतनवाढ देण्यात आली नाही. पदव्युत्तर व १० वर्षांचा अनुभव असतानाही त्यांची विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याऐवजी त्यांच्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या एमबीबीएस डॉक्टरांची विभाग प्रमुख म्हणून नियुक्त केली जाते. पाच वर्षांपासून वेतनवाढ न झाल्याबाबत डॉक्टरांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने डॉक्टरांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
डॉक्टर नोकरी सोडण्याच्या विचारात
वेतनवाढ, भविष्य निर्वाह निधी, सुट्या यांसह विविध लाभ न दिल्याने १७५ पैकी जवळपास १८ ते २० डॉक्टरांनी मागील काही महिन्यांत नोकरीचा राजीनामा दिला आहे. वेतन न वाढल्यास भविष्यात आणखी डॉक्टर नोकरी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपनगरीय रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
