मुंबई: कर्करोगाला हद्दपार करण्यासाठी आता मुंबईतील टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणार आहेत. टाटा रुग्णालय आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या माध्यमातून ‘रेझ ऑफ होप’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा रुग्णालय आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था यांच्यामध्ये गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला असून त्यानुसार टाटा रुग्णालयाची ‘अँकर सेंटर’ म्हणून निवड झाली आहे. या सामंजस्य करारावर टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता व आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल मारियानो ग्रोसी यांनी या स्वाक्षरी केली.

जगभरात स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. त्यावर उपचार करण्यासाठी टाटा रुग्णालयामध्ये अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तसेच टाटा रुग्णालयाकडून मोफत व स्वस्त दरात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. टाटा रुग्णालयातील डॉक्टरांना या रुग्णांवरील उपचाराचा अनुभव आहे. त्यांचा हा अनुभव अन्य देशातील डॉक्टरांना मार्गदर्शक ठरावा यासाठी टाटा रुग्णालय व आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमध्ये करण्यात आला आहे. त्या सामंजस्य करारानुसार अन्य देशातील डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, रेडिओथेरपी मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट फिजिशियन यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्करोगाविरोधातील लढाई आणखी तीव्र करण्यास मदत होणार आहे. तसेच या डॉक्टरांचा उपयोग संशोधन करण्यासाठी करण्यात येणार असल्याने प्रत्येक देशात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

जगातील सत्तरहून अधिक देशांना लाभ

कर्करोगासंदर्भातील शिक्षण आणि प्रशिक्षण प्रत्येकाला देता यावे यासाठी करार महत्त्वाचा ठरणार आहे जगातील ७० पेक्षा अधिक देशांशी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने करार केला आहे. त्यातील बहुतांश देशांमध्ये कर्करोगासाठी महत्त्वपूर्ण असलेली रेडिओथेरपीची सुविधाही उपलब्ध नाही. त्यामुळे या देशामध्ये कर्करोगावरील उपचार सुरू व्हावेत यासाठी टाटा रुग्णालयाकडून कोबाल्ट यंत्र पुरविण्यात येणार आहे. तसेच टाटा रुग्णालयाकडून २० देशातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे महासंचालक राफेल मारियानो ग्रोसी यांनी यावेळी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेसोबत सामंजस्य करार होणे हे कर्करोगाविरोधातील महत्त्वाचे पाऊल आहे, याचा फायदा संपूर्ण जगातील वैद्यकीय संशोधक, डॉक्टर आणि पुढील काळातील होणाऱ्या संशोधनाला चालना देण्यासाठी होणार आहे. ‘रेझ ऑफ होप’ या उपक्रमाद्वारे मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील कर्करोगाच्या रुग्णांना उच्च आणि चांगल्या दर्जाचे उपचार पुरवण्यासाठी प्रादेशिक अँकर केंद्राद्वारे उपकरण प्रशिक्षण संशोधन व नवे उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी दिली.