मुंबई : भारतामध्ये दरवर्षी सुमारे सव्वा ते दीड लाख महिलांना स्तनाचा कर्करोग होतो. शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी यांसारख्या आधुनिक उपचारांमुळे तो बरा होत असला तरी त्याचे निदान लवकर झाल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. देशभरामध्ये स्तन कर्करोगावर डॉक्टरांकडून होणाऱ्या उपचार पद्धतीमध्ये समानता असावी यासाठी टाटा रुग्णालयाकडून ‘वूमन केअर इनिशिएटिव्ह’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतातील महिलांमध्ये होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ३० टक्के प्रकरणे स्तन कर्करोगाची आहेत. देशामध्ये २० ते २५ महिलांपैकी एका महिलेला कर्करोग होण्याचा धोका असतो. स्तन कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी यांसारख्या उपचार पद्धतींमुळे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे होतात. आजाराचा टप्पा, व्यक्तीचे वय आणि कर्करोगाचे उपप्रकार यामुळे डाॅक्टरांकडून रुग्णांना वेगवेगळे सल्ले दिले जातात. त्यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी ‘वूमन केअर इनिशिएटिव्ह’ परिषदेमध्ये उहापोह करण्यात आला.

कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही रुग्णांना फक्त हार्मोन थेरपीने बरे करता येते. या पद्धतीने ट्यूमर परत येण्याचा धोका कमी करता येतो. तर कर्करोगाच्या काही उपप्रकारांवर इम्युनोथेरपीसह मल्टी ड्रग केमोथेरपीच्या माध्यमातून उपचार करता येऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण देशभरातील डाॅक्टरांकडून करण्यात येणाऱ्या उपचारांमध्ये एकसमानता आणण्यासाठी ‘वूमन केअर इनिशिएटिव्ह’ परिषदेमध्ये अनुकूल उपचार पद्धतींसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

टाटा रुग्णालयाकडून ‘वुमन कॅन्सर इनिशिएटिव्ह’ या २३ व्या वार्षिक परिषदेतर्फे ‘स्तन कर्करोग जागरूकता महिना’ पाळण्यात येत आहे. या कार्यक्रमाला टाटा मेमोरियल सेंटरचे माजी संचालक डॉ. आर. ए. बडवे, प्रा. डॉ. राजीव सरीन आणि ‘वुमन कॅन्सर इनिशिएटिव्ह’च्या उपाध्यक्षा देविका भोजवानी उपस्थित होत्या. टाटा मेमोरियलमध्ये दरवर्षी जवळपास ५ हजार महिलांवर कर्करोगाचे उपचार करण्यात येतात. तर देशभरातील विविध ठिकाणी सुमारे ५ लाख महिलांची तपासणी केली जाते, त्यातून स्तन कर्करोगाचे साधारण १५० रुग्ण आढळत आहेत.

१९७० -८० च्या दशकामध्ये महिलांच्या स्तनामध्ये सहा सेमीपर्यंतचा ट्युमर असायचा, आता दोन ते अडीच सेमींपर्यंत टयूमर होण्यापूर्वीच कर्करोगाचे निदान करण्यात यश येत आहे. स्तन कर्करोगाबाबत महिलांमध्ये करण्यात येणाऱ्या जागरुकतेमुळेच हे शक्य होत असल्याचे टाटा रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले.

स्तन कर्करोगसंदर्भातील देशात एकच उपचार पद्धती असावी. त्याबाबत कोणतेही दुमत नसावे. देशभरातून या परिषदेत आलेल्या कर्करोग तज्ज्ञांची मते जाणून एकमत केले जाणार आहे. एका डॉक्टरने दिलेले मत त्यावर दुसऱ्या डॉक्टर दिलेले अन्य विरोधी मत यामुळे रुग्णामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. परिणामी, कर्करोगाच्या आजरात रुग्ण अनेक वेळा दोन-तीन डॉक्टरांचा सल्ला घेतात. त्यामुळे या परिषदेतून मार्गदर्शक तत्त्वे निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. – डॉ राजेंद्र बडवे, माजी संचालक, टाटा मेमोरियल सेंटर