मुंबई : परळच्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनातून स्तनाच्या कर्करोगावरील उपचारपद्धतीत नवा आशेचा किरण दिसून आला आहे. दीर्घकाळ वापरात असलेले आणि किफायतशीर दरात मिळणारे कार्बोप्लॅटिन हे औषध केमोथेरपीसह दिल्यास रुग्णांच्या जगण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

या संशोधनानुसार या औषधाचा वापर केल्याने स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांचे पाच वर्षांनंतरचे जगण्याचे प्रमाण ७ टक्क्यांनी अधिक असल्याचे आढळले आहे.या नव्या संशोधनातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. जुन्या व स्वस्त अशा कॅप्सिटाबाईन या औषधाचा वापर केमोथेरपीसह केल्यास स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये पाच वर्षांनंतरच्या जगण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते असे स्पष्ट झाले आहे.टाटा मेमोरिअलच्या या अभ्यासानुसार साधारण ७२० रुग्णांवर दहा वर्षांच्या कालावधीत (२०१०-२०२०) संशोधन करण्यात आले. यात ट्रिपल निगेटिव्ह प्रकारच्या तिसऱ्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाच्या महिलांचा समावेश होता. उपचार गट दोन भागांत विभागण्यात आले.

एक गटाला पारंपरिक केमोथेरपी तर दुसऱ्या गटाला त्या उपचारासोबतच स्वस्त कार्बोप्लॅटिन औषध दिले गेले.या उपचारानंतर ६७ महिन्यांच्या निरीक्षणात असे आढळले की, कार्बोप्लॅटिन औषध घेणाऱ्या रुग्णांचे पाच वर्षांनंतरचे जगण्याचे प्रमाण ७४.४ टक्के होते, तर पारंपरिक उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये ते ६६.८ टक्के राहिले. म्हणजेच प्रत्येक १०० रुग्णांपैकी सात जण जास्त काळ जिवंत राहिले.

टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे माजी संचालक डॉ. राजन बडवे यांनी सांगितले की, ही औषधे स्वस्त असून दर उपचार खर्च फक्त पाच हाजार रुपये इतका येतो. त्यामुळे ही पद्धत गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांसाठी मोठी दिलासादायक ठरू शकते.ट्रिपल निगेटिव्ह कर्करोगाचा प्रकार इतरांपेक्षा अधिक आक्रमक व तरुण महिलांमध्ये सामान्यपणे आढळतो. या प्रकारात हार्मोन रिसेप्टर नसल्याने महागडी टार्गेटेड थेरपी उपयोगी ठरत नाही. अशा वेळी ही स्वस्त औषधोपचार पद्धत अधिक आशादायक ठरत असल्याचे संशोधकांचे मत आहे.याबाबत टीएमसीचे दीर्घकालीन प्रयत्न असून यापूर्वीही टाटा मेमोरिअल हॉस्पिटलने कमी खर्चात प्रभावी उपचार विकसित करण्यावर भर दिला आहे.२०११ मध्ये टीएमएचच्या डॉक्टरांनी स्तनाच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रियेपूर्वी दिल्या जाणाऱ्या औषधांचे स्थानिक पर्याय तयार केले, ज्यामुळे पुनरावृत्तीचे प्रमाण २६ टक्क्यांनी घटले आणि जगण्याचे प्रमाण जवळपास ३० टक्क्यांनी वाढले. आता या नव्या अभ्यासाने त्या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग असून दरवर्षी सुमारे २२ लाख नवीन रुग्णांची नोंद जगभर होते. भारतातच दरवर्षी १.५ ते १.८ लाख महिलांना हा रोग होतो. विकसित देशांच्या तुलनेत भारतातील महिलांमध्ये निदान उशिरा होते, त्यामुळे मृत्युदर जास्त राहतो.भारतामध्ये महिलांमधे नियमित तपासणीबाबत अजूनही जागरूकता कमी आहे. यामुळे निदान होईपर्यंत रोग तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचतो. परिणामी, उपचार खर्च जास्त आणि यशाचे प्रमाण कमी राहते.

या पार्श्वभूमीवर टाटा मेमोरिअलचा हा अभ्यास विशेष महत्त्वाचा ठरतो कारण तो भारतीय परिस्थितीत, भारतीय रुग्णांवर आणि स्वदेशी औषधोपचार पद्धतीवर आधारित आहे.डॉ. सुशांत गुप्ता, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक म्हणाले हा अभ्यास भारतातील स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांना नवी दिशा देणारा आहे. केमोथेरपीसह दिले जाणारे कार्बोप्लॅटिन उपचार रुग्णांचे आयुष्य वाढवतात, आणि तेही कमी खर्चात. त्यामुळे ग्रामीण आणि निम्न-आर्थिक स्तरातील महिलांनाही प्रभावी उपचार मिळू शकतील.या संशोधनाने हे सिद्ध केले आहे की कर्करोगावरची लढाई फक्त महागड्या औषधांनी जिंकता येत नाही. योग्य नियोजन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उपलब्ध संसाधनांचा परिणामकारक वापर केल्यासही मोठे परिणाम साधता येतात.भारतातील हजारो महिलांसाठी हा नवा अभ्यास आशेचा किरण ठरला आहे.