मुंबई : राज्यात यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून ११ ऑगस्टपर्यंत सर्व भागांमध्ये पावसाची तूट नोंदली गेली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार मराठवाडा विभागात पावसाची र्सवाधिक तूट आहे. कोकण, विदर्भ भागातही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर, संपूर्ण राज्यात सरासरी ९ टक्के पावसाची तूट आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, रायगड भागात मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

यंदा मोसमी पाऊस राज्यात लवकर दाखल झाला असला तरी, जुलै महिन्यात घेतलेली मोठी विश्रांती तसेच ऑगस्ट महिन्याचे सुरुवातीचे काही दिवस पावसाची उघडीप असून त्यामुळे राज्यात पावसाची तूट आहे. कोकणात १ जून ते ११ ऑगस्ट या कालावधीत २०९२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा येथे १८६९.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच ११ टक्के पावसाची तूट आहे. विदर्भ येथे ६०४.५ मिमी पाऊस पडतो. यंदा ५६९.१ मिमी पाऊस पडला आहे. येथे ६ टक्के पावसाची तूट आहे. मध्य महाराष्ट्रात ४७५ मिमी पाऊस पडतो. येथे आत्तापर्यंत ४५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच येथे ५ टक्के पावसाची तूट आहे.

त्यानंतर सर्वाधिक पावसाची तूट मराठवाड्यात आहे. तेथे १ जून ते ११ ऑगस्ट ३६९.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र, येथे २८६.५ मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच मराठवाड्यात २२ टक्के पावसाची तूट आहे. दरम्यान, तालुकानिहाय आकडेवारीनुसार, १ जून ते ११ ऑगस्टपर्यंत नाशिक येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर, सातारा, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, लातूर, गडचिरोली आणि जालना या तालुक्यांमध्ये पावसाची सर्वाधिक तूट नोंदली गेली आहे. इतर तालुक्यांमध्ये सामान्य पावसाची नोंद आहे.

पुढील पाच दिवस पावसाचे

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानुसार, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर कोल्हापूर घाट परिसर, विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे, पश्चिम उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून झारखंडपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे कायम आहेत.

त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही बागात पावसाची शक्यता आहे. राज्यात बुधवारनंतर पावसाचा जोर वाढेल. मंगळवारी काही भागात मेघगर्जनेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.