शिधावाटप विभागाच्या कारवाईचा परिणाम

मधु कांबळे, मुंबई</strong>

मुंबई व ठाणे क्षेत्रात गॅस सिलिंडर व केरोसिनचा वापर करणाऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा शोध घेऊन, त्यांचे केरोसिन बंद करण्याची कारवाई शिधावाटप नियंत्रण विभागाच्या वतीने करण्यात आली. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात एका लिटरचीही केरोसिनची मागणी आली नाही. त्यानुसार, आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर व मीरा-भाईंदर ही महापालिका क्षेत्रे केरोसिनमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती शिधावाटप नियंत्रक व संचालक कैलास पगारे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

या सहा महापालिका क्षेत्रात एकूण ४१ लाख शिधापत्रिकाधारक कुटुंबे आहेत. शिधावाटप दुकानांमधून गहू, तांदूळ यांबरोबर केरोसिनचे वितरण केले जाते. ज्यांच्याकडे गॅस सिलिंडर आहे, त्यांना केरोसिन देता येत नाही, असा नियम आहे. तरीही शिधावाटप दुकानांमधून महिन्याला ५ हजार ५०० किलो लिटर केरोसिनची विक्री केली जात होती. मोठय़ा प्रमाणावर गॅस सिलिंडरधारक कुटुंबे असताना एवढय़ा मोठय़ा संख्येने केरोसिनची विक्री कशी होते, हा प्रश्न होता. त्याचा शोध घेण्याचे ठरविले. त्यानुसार विभागवार शिबिरे घेण्यात आल्याचे पगारे यांनी सांगितले.

राज्यातील सर्व शिधापत्रिका आधार क्रमांकाशी जोडलेल्या आहेत. गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या इिडयन ऑइल, बीपीसीएल.एचपीसील या कंपन्यांकडून यादी मागवण्यात आली. शिधापत्रिकाधारकांचा आधारपत्र क्रमांक व ती यादी यांची पडताळणी केली असता, किरकोळ अपवाद वगळता बहुतांश कुटुंबांकडे गॅस असल्याचे आढळून आले. पाइपलाइनद्वारे पुरविल्या जाणाऱ्या गॅस जोडणीचीही अशाच प्रकारे माहिती घेण्यात आली. ज्यांच्याकडे गॅस आहे, त्यांच्या शिधात्रिकेवर तसा शिक्का मारून त्यांचे केरोसिन बंद करण्यात आले. काही थोडक्या कुटुंबांकडे गॅस नव्हता, त्यांना उज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी मिळवून दिली, अशी माहिती त्यांनी दिली. या महापालिका क्षेत्रांतील स्वस्त धान्य दुकानांमार्फत दर महिन्याला साडेपाच हजार किलो लिटर केरोसिनची विक्री व्हायची, मात्र या मोहिमेमुळे, सप्टेंबर महिन्यात एका लिटरचीही मागणी आली नाही. उलट जुलैमधील केरोसिनचा काही कोटा अजून शिल्लक आहे.

केरोसीन वापरणारे एकही कुटुंब नाही!

या कारवाईमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबविली, उल्हासनगर व मीरा-भाईंदर या महापालिका क्षेत्रातील ४१ लाख शिधापत्रिकाधारक कुटुंबांपैकी स्वंयपाक व दिवाबत्तीसाठी केरोसिन वापरणारे एकही कुटुंब शिल्लक राहिलेले नाही. या अर्थाने ही सहा महापालिका क्षेत्रे केरोसिनमुक्त झाली आहेत, असे कैलास पगारे यांनी सांगितले.