मुंबई/पुणे : थंडीसाठी हक्काचा महिना असलेल्या डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. मुंबईसह कोकण विभागात सर्वत्र, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज कृषी आयुक्तालय आणि कृषी हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या पावसाचा फटका भाज्यांना बसला असून, बहुतांश भाज्यांचे दर शंभरीपार झाले आहेत.

लांबलेल्या मोसमी पावसामुळे लुप्त झालेली ‘ऑक्टोबर हीट’ची स्थिती आणि नोव्हेंबरमध्ये तीनही ऋतूंची अनुभूती राज्यातील नागरिकांना मिळाल्यानंतर सलग तिसऱ्या महिन्यात हवामानाचा लहरीपणा नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे. थंडीसाठी हक्काच्या समजल्या जाणाऱ्या डिसेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. बुधवारी अनेक भागांत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. पश्चिम कोकणात पावसाचा जोर अधिक होता. हवामान विभागाच्या नोंदींनुसार बुधवारी सांताक्रूझ येथे २८.६ मिमी, कुलाबा येथे २७.६ मिमी, डहाणू येथे ११.६ मिमी, ठाणे येथे २७.२ मिमी पाऊस पडला.

पाऊस कशामुळे?

अरबी समुद्रामध्ये ३० नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. १ डिसेंबरला त्याची तीव्रता वाढल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. अरबी समुद्रापासून कच्छपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या पश्चिम भागात त्याचा परिणाम होतो आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याची तीव्रता वाढत आहे. २ डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून, ते आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे. त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही.

आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर कमी होणार असला, तरी आणखी दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पावसाळी वातावरण राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांत आणखी एक दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे.