“गेल्या अनेक वर्षांपासून गिरणी कामगारांसाठीच्या २,५२१ घरांची सोडत रखडली असून ही सोडत लवकरात लवकर काढण्यात येईल.”, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) म्हाडाला हस्तांतरित केलेल्या मे. टाटा हौसिंग कंपनी लिमिटेड, रांजनोळी, ठाणे येथील १,२४४, श्री विनय अगरवाल शिलोटर, रायचूर, रायगड येथील १,०१९ आणि मे. सांवो व्हिलेज, कोल्हे येथील २५८ अशा एकूण २५२१ घरांसाठी सोडत काढण्याची तयारी मुंबई मंडळाने केली आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून निरनिराळ्या कारणांमुळे ही सोडत रखडली आहे. ही सोडत लवकरात लवकर काढावी, अशी मागणी गिरणी कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाने १७ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती.

यावेळी २,४२१ घरांच्या सोडतीबरोबरच दीड लाख कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी २,५२१ घरांच्या सोडतीचा प्रश्न महिन्याभरात मार्गी लावू, असे आश्वासन दिल्याची माहिती गिरणी कामगार कृती समितीचे सदस्य प्रवीण येरुणकर यांनी दिली.