मुंबई : मालाड येथे धावत्या गाडीच्या छताच्या दरवाज्यातून (सनरूफ) बाहेर येऊन तीन तरुणी धोकादायक स्टंटबाजी (साहसी कृत्य) करीत असल्याची एक चित्रफित व्हायरल झाली असून याप्रकरणी समाजमाध्यमावरील तक्रारीची दखल घेत बांगून नगर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एका वाहनचालकाने बुधवारी रात्री आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात स्टंटबाजीचा हा थरार चित्रित केला होता.
मालाड परिसरात बुधवारी रात्री भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनाच्या छतावरील दरवाज्यातून (सनरूफ) बाहेर येऊन धोकादायक नृत्य करणाऱ्या तीन तरुणींची एक चित्रफित समाजमाध्मयावर व्हायरल झाली होती. कांदिवली आणि मालाडदरम्यान हा प्रकार घडला. मालाडच्या मिथ सिग्नल चौकीजवळ एका वाहनचालकाने रात्रीच्या सुमारास या स्टंटबाजीचे चित्रिकरण आपल्या मोबाइलमध्ये केले.
एक चारचाकी वाहन (एमएच ४७ बीझेड ८१२०) भरधाव वेगात धावत होते. वाहनाच्या छतावरील दरवाजा (सनरूफ) उघडून तीन तरूणी धोकादायक नृत्य करीत होत्या. त्याचवेळी आत चालकाशेजारी बसलेला एक तरुण दरवाजातून बाहेर डोकावून स्टंट करीत होता. हे सर्व जण मद्यधुंद असल्याचे वाटत होते. भर रस्त्यात त्यांची स्टंटबाजी अत्यंत धोकादायक होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते बीनू वर्गीस यांनी आपल्या ‘एक्स’वरून (पूर्वीचे ट्विटर) ही चित्रफित शेअर करून कारवाईची मागणी केली होती.
समाजमाध्यमावरील तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल
समाजमाध्यमावरून करण्यात आलेल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली आहे. कांदिवली आणि मालाड दरम्यान ही गाडी भरधाव वेगाने जात होती. त्यामुळे हा प्रकार नेमक्या कुठल्या पोलीस ठाण्याअंतर्गत आहे ते निश्चित होत नव्हते. अखेर दुपारी १२ च्या सुमारास बांगूर नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वाहनातून स्टंटबाजी करण्याच्या यापूर्वीच्या घटना
- २३ जुलै – नवी मुंबईतील खारघर येथे समाजमाध्यम प्रभावक नझमीन सुलदे ही मसिर्डीज बेन्झ या महागड्या गाडीवर उभी राहून नृत्य करीत असल्याची चित्रफित व्हायरल झाली होती.
- ९ जुलै – प्रसिद्ध गायक-गीतकार यासेर देसाईने वांद्रे वरळी सागरी सेतूवर (सी लिंक) गाडी थांबवून धोकादायक ‘स्टंट’बाजी केली होती. वांद्रे पोलिसांनी यासेर देसाईसह इतर दोघांविरोधात सार्वजनिक ठिकाणी जीव धोक्यात घालणारी कृती (स्टंट) केल्या प्रकरणी कलम ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वाहनातून स्टंटबाजी धोकादायकच
चालत्या वाहनात उभे राहून स्टंटबाजी करणे अत्यंत धोकादायक आहे. असे कृत्य केवळ स्वतःच्या जीवावरच नाही, तर इतरांच्या जिवावरही बेतू शकते. थोडासा तोल गेला, किंवा वाहनाने थोडे वळण घेतले तरी थेट रस्त्यावर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे गंभीर जखमी वा मृत्यू होऊ शकतो. स्टंट करताना वाहनाचा वेग नियंत्रित ठेवता येत नाही, त्यामुळे समोरून येणाऱ्या किंवा मागून येणाऱ्या वाहनांची धडक बसण्याचा मोठा धोका असतो. अशा कृतीमुळे रस्त्यावर धवाणाऱ्या इतर वाहनांच्या चालकांचे लक्ष विचलित होऊन त्यांचाही अपघात होऊ शकतो, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.