मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेल्या हजारो आंदोलनकर्त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेतर्फे आझाद मैदान व आसपासच्या परिसरात सुमारे ४०० प्रसाधनगृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच, प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसाठी मनुष्यबळासह अद्ययावत यंत्रे तैनात करण्यात आली आहेत. ही प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच इतरांच्या वापरासाठी सुयोग्य स्थितीत ठेवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याचे २५ टँकर्सही पालिकेने उपलब्ध करून दिले आहेत.

मुंबईतील आझाद मैदानात मराठा नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे. पहिल्या दिवशी आंदोलनकर्त्यांना शौचालये, उपहारगृहे, खाद्यपदार्थांची दुकाने बंद असल्याने गैरसोयींचा सामना करावा लागला. त्यामुळे आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई महानगरपालिकेवर टीका केली. त्यानंतर, महापालिकेने त्याच दिवशी रात्री पिण्याचे पाणी, मोफत शौचालये तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या. मात्र, आंदोलनकर्त्यांच्या तुलनेत प्रसाधनगृहांची संख्या तुलनेने अत्यंत कमी असल्याने पुन्हा आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पालिकेने प्रसाधनगृहांच्या संख्येत वाढ केली आहे.

सद्यस्थितीत महापालिकेने ४०० प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली असून त्या सर्व प्रसाधनगृहांची महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने स्वच्छता केली जात आहे. तसेच, तेथे ३५० फिरती (पोर्टेबल) आणि आंदोलनस्थळाच्या ५० प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसाठी ५ सक्शन तसेच जेटिंग संयंत्रे तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, आंदोलनकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे एकूण २५ टँकर्सही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार जवळच्या भरणा केंद्रातून टँकर्स भरून पाणीपुरवठा केला जात आहे. मैदान परिसरात कीटक व डासांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सातत्याने धूम्रफवारणी करण्यात येत आहे. त्यासाठी एकूण ६ पथक कार्यरत आहेत.

५७७ आंदोलकांनी घेतला वैद्यकीय सुविधांचा लाभ

आंदोलनस्थळी २४ तास वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत आहेत. हजारो आंदोलनकर्त्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. ३१ ऑगस्ट या एका दिवसात एकूण ५७७ आंदोलकांनी वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतला. तसेच, काही रूग्णांना विविध कारणांमुळे पुढील वैद्यकीय उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात जाण्यास सांगण्यात आले आहे. वैद्यकीय मदत कक्षासाठी पुरेसा औषधांचा साठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे.