मुंबई : हार्बर मार्गावरील रे रोड स्थानकाजवळ केबल स्टेड उड्डाणपूल उभारण्यात आला असून हा मुंबईतील पहिला केबल स्टेड पूल आहे, जो पूर्णपणे जमिनीवर बांधला गेला आहे. तर, मुंबईतील दुसरा जमिनीवरील केबल स्टेड उड्डाणपूल भायखळा रेल्वे स्थानकाजवळ उभारला जात आहे. आतापर्यंत या पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून हा पूल मार्च २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एआरआयडीसी-महारेल) भायखळा पूर्व – पश्चिम परिसर जोडण्यासाठी उड्डाणपूल बांधत आहे. हा पूल वांद्रे सागरी सेतू, रे रोडप्रमाणे केबल स्टेड आधारित आहे. या केबल स्टेड पुलाच्या चार मार्गिका असतील. त्यामुळे वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. भायखळा येथे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत व्यत्यय न आणता काम सुरू आहे. पायलॉनचे (मोठे खांब) कामे पूर्ण झाले असून सध्या केबल्स बसवल्या जात आहेत. फोर्ट ते उपनगर किंवा भायखळा रेल्वे स्थानकाजवळून या कामाची झलक पाहता येते. हा पूल पूर्ण झाल्यानंतर, सध्याच्या पुलावरून वाहतूक नवीन पुलाकडे वळवली जाईल. सध्याचा ‘वाय’ पुलाचा एक स्पॅन तोडण्यात येईल आणि नवीन केबल स्टेड उड्डाणपुलाला जोडला जाईल, असे महारेलकडून सांगण्यात आले.

डिसेंबर २०२१ पासून उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने उड्डाणपुलाचे काम जुलै २०२४ मध्ये पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर पुलाच्या लोकार्पणासाठी ऑक्टोबर २०२५ मधील मुहूर्त धरण्यात आला होता. परंतु, काही अडचणींमुळे या पुलाचे काम मंदावले. आता भायखळा पूर्व आणि पश्चिम दिशेला या पुलाचे काम वेगात सुरू आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीतील कामे पूर्ण करण्यासाठी ब्लाॅकची मागणी मध्य रेल्वेकडे केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ब्लाॅक मिळाल्यास, रेल्वेच्या हद्दीतील कामांना गती येईल. उड्डाणपूल मार्च २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे महारेलकडून सांगण्यात आले.

  • या पुलाची उंची ९.७० मीटर व लांबी ९१६ मीटर असेल.
  • सेल्फी पॉइंट
  • प्रकल्पाचा अंदाजित खर्च २८७ कोटी रुपये

सीएसएमटी येथील जे.जे. उड्डाणपूलमार्गे भायखळ्यापर्यंतचा प्रवास जलदगतीने करता येतो. मात्र पुढे भायखळ्याला मोहम्मद अली रोड आणि मुंबई सेंट्रल, नागपाड्यातून येणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे भायखळा सिग्नल, रेल्वे स्थानक परिसर, तसेच पूर्वेला अग्निशमन दल मुख्यालय, बकरी अड्डा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी भायखळा पूर्व आणि पश्चिम जोडणारा उड्डाणपूल फायदेशीर ठरेल.