मुंबई : शिमगोत्सवानिमित्त मुंबईस्थित कोकणवासियांनी कोकणातील गावाची वाट धरली आहे. रेल्वे आणि एसटी बसचे आरक्षण मिळत नसल्यामुळे अनेकांनी खासगी बसगाड्यानी कोकणात जाणे पसंत केले. मात्र त्यासाठी त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागले. दरवर्षी होळीनिमित्त मुंबईमधून मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात.

यंदाही मुंबईस्थित कोकणवासियांनी महिन्यांपूर्वीच लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या, एसटीच्या बसगाड्यांचे आरक्षण केले होते. मात्र अनेकांना रेल्वेगाड्या आणि एसटी बसगाड्यांचे आरक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे अनेकांनी खासगी बसगाड्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, खासगी बस कंपन्यांनी होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन अव्वाच्या सव्वा भाडे आकारले. कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी ठिकाणानुसार सुमारे ७०० ते १७०० रुपयांदरम्यान तिकीट दर आकारण्यात आले. होळीनिमित्त घरची ओढ लागलेल्या बहुसंख्य मुंबईस्थित कोकणवासियांनी अधिकची पदरमोड करीत खासगी बसगाडीने गावी जाणे पसंत केले.

हेही वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करून १५ लाखांची फसवणूक, दोघांना अटक

यंदा होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी, एसटी महामंडळानेही कोकणात जाण्यासाठी जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी रेल्वेने कोकण गाठले. विशेष रेल्वे गाड्या आणि एसटीच्या गाड्या पूर्ण क्षमतेने आरक्षित असल्याने, तसेच गाड्यांची संख्या अपुरी पडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : इन्स्टाग्राम मित्राला भेटण्यासाठी अल्पवयीन मुलगी नेपाळहून एकटीच आली; पण प्रियकराने मुंब्र्यात…

खासगी ट्रॅव्हल्स तिकीट दर

मुंबई ते रत्नागिरी – ६९९ ते १,२०० रुपये

मुंबई ते कणकवली – ९१९ रुपये

मुंबई ते गुहागर – ५९९ ते ८९९ रुपये

मुंबई ते चिपळूण – ६९९ ते १,२०० रुपये

हेही वाचा : मुंबई : मोनोरेल मार्गिकेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक

मुंबई ते वैभववाडी – १,०९९ रुपये

मुंबई ते राजापूर – ७९९ ते ८९९ रुपये

मुंबई ते लांजा – ७९९ ते १,२०० रुपये

मुंबई ते सावंतवाडी – १,७९९ रुपये

मुंबई ते मालवण – १,३४९ रुपये