मुंबई : दहिसर नदीत गुरुवारी सकाळी आणि सायंकाळी दोन हरिण आढळली. यापैकी नदीमध्ये सकाळी आढळलेल्या हरणाची सुखरुप सुटका करण्यात आली. राष्ट्रीय उद्यानातील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून त्याला नदीतून सुखरुप बाहेर काढून जीवदान दिले. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा एक हरिण नदीपात्रात पडल्याचे समोर आले.
दहिसर नदीत गुरुवारी सकाळी पडलेल्या हरिणाला तात्काळ बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. याच दिवशी सायंकाळी ७ च्या सुमारास पुन्हा एक हरिण नदीत पडल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मिळाली. सायंकाळी अंधार पडेला आणि नदीला बऱ्यापैकी पाणी होते. त्यामुळे त्या हरणाची सुटका करणे शक्य नव्हते. त्यामुळे उद्यानाचे कर्मचारी दुसऱ्या दिवशी सकाळी तेथे जाणार होते. दरम्यान, गुरुवारी रात्री एका प्राणी संस्थेच्या सदस्यांनी त्या रहणाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, ते हरिण त्या सदस्यांच्या हाती लागले नाही. यानंतर शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास उद्यानातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना ते हरिण आढळले नाही. या हरणाचा शोध अद्याप सुरू आहे.
नदीपात्रात कसे येतात
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात हरणांचा अधिवास आहे. पाणी, गवत व आश्रय शोधण्यासाठी ते उद्यानाच्या सीमारेषे बाहेर भटकताना दिसतात. दहिसर, पोईसर यासारख्या नद्या व नाले हे त्यांच्या मार्गात येतात. पाणी पिताना किंवा उडी मारताना घसरून ते नदीत पडतात. नदीत अडकल्यावर त्यांना बाहेर पडणे अवघड होते, त्यामुळे जीव धोक्यात येतो.