मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या(बेस्ट) महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार दोन सनदी अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याने एकाच दिवशी काढल्याने सरकारमध्ये नियुक्तीचा घोळ झाला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील सुप्त संघर्ष आहे का, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

एकाच दिवशी दोन सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरुन सरकारमध्येच गोंधळ सुरू असल्याचे बुधवारी समोर आले. बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी एकाचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून आशिष शर्मा यांची तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने अश्विनी जोशी यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून फडणवीस आणि शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्याकडे गेले काही महिने बेस्ट महाव्यवस्थापकांचा अतिरिक्त कार्यभार होता. श्रीनिवास ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्यापासून गेले पाच दिवस बेस्ट महाव्यवस्थापक पद रिक्त होते. आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती.

बेस्ट कर्मचारी संपावर गेल्यास मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याच्या धास्तीने नगरविकास विभागाने बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे देण्याचे आदेश मंगळवारी काढला.. त्यानुसार जोशी यांनी महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार तत्काळ स्वीकारुन आंदोलकांशी चर्चा करुन संप होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना मंत्रालयातून महापालिकेस देण्यात आल्या. त्यानुसार जोशी बुधवारी सकाळी अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याच्या तयारीत असतानाच सामान्य प्रशासन विभागानेही वस्तू व सेवाकर आयुक्त आशिष शर्मा यांना बेस्ट महाव्यवस्थापकाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याचे आदेश दिल्याची बाब समोर आली. त्यामुळे अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारायचा यावरुन दोन्ही अधिकाऱ्यांमध्येच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या गोंधळावर मग मार्ग काढण्यात आला. यानुसार शर्मा यांना बेस्ट महाव्यवस्थापकाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आले.

शर्मा गेल्या काही महिन्यांपासून बेस्ट महाव्यवस्थापकांसाठी राखीव असलेल्या महापालिकेच्या निवास्थानातच राहतात. त्यामुळेच त्यांच्याकडे बेस्टचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याचे सांगितले जाते. यापू्र्वीही अनिल डिग्गीकर यांची बेस्टमधून मंत्रालयात बदली झाल्यानंतर अश्विनी जोशी यांच्याकडे बेस्ट महाव्यवस्थापकाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. तोही काही दिवसातच श्रीनिवास यांच्याकडे देण्यात आला होता. सामान्य प्रशासन आणि नगरविकास विभागाने एकाच पदावर दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढल्याने महायुती सरकारमधील गोंधळ समोर आला. आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील स्पर्धा असल्याची टीका राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

नगरविकास विभागाची सारवासारव

भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यांच्या बदल्या वा नियुक्त्यांचे सारे अधिकार हे सरकारच्या कामकाजाच्या नियमाप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचे असतात. हे खाते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे. यामुळे कोणाची नियुक्ती करायची याचा अधिकार हा सामान्य प्रशासन विभागाचा होता. आय.ए.एस. अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा आदेश नगरविकास विभागाने काढल्याबद्दल सनदी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नगरविकास विभागाच्या सचिवांनी ही बाब नजरेआड कशी केली, असा सवाल केला जात आहे. ‘बेस्ट’ वरून हसे होताच नगरविकास विभागाने रात्री खुलासा केला आहे. त्यात अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचा आदेश काढण्याची कार्यवाही सुरू होती, पण तेवढ्यात सामान्य प्रशासन विभागाने वेगळा आदेश काढल्याने नगरविकास विभागाने अधिकृतपणे आदेश काढलेला नाही, असा हास्यास्पद खुलासा केला आहे.