मुंबई : मुंबई विद्यापीठाचे साधारण २८ कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. बाळासाहेब ठाकरे अध्यासन, राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान, माय मराठी प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचे अनुदान अजूनही थकलेले आहे.
विद्यापीठाला विविध योजनांसाठी शासनाकडून अनुदान मिळते. लेखा आणि विकास कक्षासाठी ६३ कोटी ३२ लाख ७२ हजार ९९७ रुपये अनुदान मंजूर झाले होते. प्रत्यक्षात ३५ कोटी ८२ लाख ७२ हजार ९९७ रुपये विद्यापीठाला मिळाले आहेत तर २७ कोटी ५० लाख रुपये अद्यापही मिळालेले नाहीत. बाळासाहेब ठाकरे अध्यसनासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी फक्त १ कोटी रुपये मिळाले असून ४ कोटी रुपये प्रलंबित आहेत. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानासाठी मंजूर झालेल्या २० कोटी रुपयांपैकी १५ कोटी रुपये मिळाले असून ५ कोटी रुपये प्रलंबित आहे.
सार्वजनिक धोरण आणि अर्थशास्त्राच्या प्रकल्पासाठी मंजूर असलेल्या २५ कोटी रुपयांपैकी अवघे साडेसहा कोटी रुपये विद्यापीठाला मिळाले आहेत. या योजनेचे १८ कोटी ५० लाख रुपये शासनाकडून येणे आहे. जर्मन विभागासाठी मंजूर करण्यात आलेल्या १ कोटी ८० लाख रुपयांच्या अनुदानांपैकी ४८ लाख २७ हजार रुपये विभागाला मिळालेले नाहीत.
आतापर्यंत सामाजिक कक्षाअंतर्गत महिला वसतिगृहासाठी १० कोटी रुपये, रत्नागिरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयासाठी १ कोटी ७९ लाख रुपये, सिंधुदुर्ग येथे विजयालक्ष्मी महाविद्यालयासाठी ९१ लाख ५७ हजार रुपये तर महाराष्ट्र राज्य विश्वकोशनिर्मिती मंडळासाठी ५७ लाख ६० हजार रुपये विद्यापीठाला मिळाले आहेत, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना विद्यापीठाकडून मिळाली.