मुंबई : क्वॅकेरली सायमंड्सतर्फे (क्यूएस) ‘जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२६’ नुकतीच जाहीर करण्यात आली असून मुंबई विद्यापीठाने भारतातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थाच्या यादीत १७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राज्यातील पारंपारिक विद्यापीठांच्या यादीत द्वितीय स्थान पटकावले आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत मुंबई विद्यापीठाने यंदा जागतिक विद्यापीठ क्रमवारीत सुधारणा केली असून ‘७११ ते ७२०’ क्रमवारीच्या बँडमधून बाहेर पडत ६६४ वे स्थान निश्चित केले आहे.

‘क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२६’ अहवालानुसार मुंबई विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करीत ‘रोजगार परिणाम’ निकषात सर्वाधिक ९५ गुण प्राप्त केले आहेत. त्यानंतर ‘सायटेशन पर फॅकल्टी’ वर्गवारीत ५३.७, शाश्वतता ४१.३, एम्प्लॉयर रेप्युटेशन ३१.५, आंतरराष्ट्रीय संशोधन २७.६, त्याचबरोबर शैक्षणिक प्रतिष्ठा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी प्रमाण आणि विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर या निकषांमध्येही विद्यापीठाने चांगले गुण मिळविले आहेत. गेल्या काही वर्षात मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करून विविध व्यावसायिक आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

देशपातळीवर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मुंबई विद्यापीठाने उत्तम कामगिरी करीत विजेतेपद पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नियतकालिकांमधील शोधनिबंधांमध्ये १५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यापीठाच्या १२ विभागांना अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाशी संलग्नित असलेले ८० हून अधिक प्राध्यापक हे विविध व्यावसायिक कार्यकारणींवर कार्यरत आहेत. तर गेल्या पाच वर्षात १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने प्राध्यापकांना गौरविण्यात आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई विद्यापीठातील सर्व घटकांनी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष व शाश्वत प्रयत्नांची ही फलनिश्पती आहे. या निकालाचे समाधान असून क्रमवारीमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाने युडीआरएफसारखे अभिनव प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण, शाश्वत विकास आणि प्राध्यापक भरतीमुळे भविष्यात क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी मुंबई विद्यापीठ प्रयत्नशील आहे. – डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ