मुंबई : कोणत्याही परीक्षेचा निकाल ४५ दिवसांत जाहीर होणे अपेक्षित असताना मुंबई विद्यापीठाने पदव्युत्तर विधी शाखा (दोन वर्षीय अभ्यासक्रम) तृतीय सत्र परीक्षेचा निकाल तब्बल ११० दिवसांनंतर बुधवारी जाहीर केला. या परीक्षेत ५७.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, तर ४२.२२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
हेही वाचा >>> मराठा आरक्षणासाठी सात दिवसात ३९ लाख कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट्य, ३० हजार कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही घरोघरी फिरणार
मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ हिवाळी सत्राअंतर्गत पदव्युत्तर विधी शाखेची (दोन वर्षीय अभ्यासक्रम) तृतीय सत्र परीक्षा ३ व ५ ऑक्टोबर २०२३ रोजी घेतली होती. परंतु तब्बल ११० दिवसांचा कालावधी लोटूनही निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. त्यात करोनामुळे प्रवेश प्रक्रिया उशीरा होऊन आधीच शैक्षणिक वर्ष कोलमडल्यामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहेत. अखेर बुधवार, २४ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला. या परीक्षेसाठी एकूण ८८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ४९० विद्यार्थी उत्तीर्ण व ३५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तर ४१ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. विद्यार्थ्यांना सदर निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.
हेही वाचा >>> मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्यास HC चा नकार; सदावर्तेंची मागणी फेटाळली, राज्य सरकारला दिले महत्त्वाचे आदेश
पदव्युत्तर विधी शाखा द्वितीय वर्ष तृतीय सत्र परीक्षेचा निकाल ४५ दिवसांत जाहीर होणे अपेक्षित होते. असे असताना तब्बल ११० दिवसांनंतर निकाल जाहीर करण्यात आला. मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून विविध अभ्यासक्रमांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर केले जात नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कोलमडते. त्यामुळे निकाल जाहीर करण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, जेणेकरून सर्व निकाल निर्धारित वेळेत जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे, असे शिंदे गटाच्या युवा सेनेचे उपसचिव ॲड. सचिन पवार यांनी सांगितले.
संपूर्ण अभ्यासक्रम जुलै २०२३ मध्ये संपणे अपेक्षित होते
मी २०२१ – २३ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी आहे. सर्व चारही सत्र संपूर्ण अभ्यासक्रम हा जुलै २०२३ मध्ये संपणे अपेक्षित होते. तृतीय सत्र परीक्षेचा निकाल तब्बल ११० दिवसांनंतर जाहीर झाला. सातत्याने निकालाला विलंब होत असल्यामुळे आमचे शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. सध्या चतुर्थ सत्राअंतर्गत संशोधन प्रबंधाची प्रक्रिया सुरू आहे. शैक्षणिक वर्ष कोलमडल्यामुळे उच्च शिक्षण, पीएच.डी. करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी खंत एका विद्यार्थ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर व्यक्त केली.