मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाकडून प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २६ मे रोजी दुपारी १ वाजेपर्यंत https://mu.ac.in/admission या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे. त्यानंतर २७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ‘पहिली गुणवत्ता यादी’ संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून जाहीर होईल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स, तसेच ऑनर्स विथ रिसर्च, ५ वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिटला अनुसरून ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. तसेच बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत विविध अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत २ लाख २५ हजार ५५६ एवढी नोंदणी झाली आहे. तर प्रत्यक्षरित्या
१ लाख ४५ हजार ८७ एवढ्या विद्यार्थ्यांकडून विविध अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत ५ लाख ९ हजार ५७८ एवढे अर्ज सादर झाले आहेत.
‘मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमित केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी. तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी’, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक
- अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाईन /ऑफलाईन) : २६ मे रोजी दुपारी १ पर्यंत
- प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी व प्रवेश अर्ज सादर करण्याची तारीख : २६ मे रोजी दुपारी १ वाजेपर्यंत (संस्थात्मक प्रवेश आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश याच कालावधीत होतील)
- पहिली गुणवत्ता यादी : २७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता
- कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि हमीपत्र अर्जासह शुल्क भरून प्रवेश निश्चिती : २८ ते ३० मे रोजी दुपारी ३ पर्यंत
- दुसरी गुणवत्ता यादी : ३१ मे रोजी सायंकाळी ७ वाजता
- कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि हमीपत्र अर्जासह शुल्क भरून प्रवेश निश्चिती : २ ते ४ जून रोजी रोजी दुपारी ३ पर्यंत
- तिसरी गुणवत्ता यादी : ५ जून रोजी सकाळी ११ वाजता
- कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि हमीपत्र अर्जासह शुल्क भरून प्रवेश निश्चिती : ६ ते १० जून रोजी दुपारी ३ पर्यंत
- नियमित तासिकांना सुरुवात : १३ जून