मुंबई : ‘इंद्रधनुष्य’ या एकवीसाव्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा अव्वल क्रमांक मिळवत जेतेपद पटकावले. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ५ ते ९ नोव्हेंबर या दरम्यान आयोजित या युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने विजयी मोहर उमटवली.

स्पर्धेच्या २१ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मुंबई विद्यापीठाने तब्बल २० वेळा विजेतेपदाचा चषक आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. विद्यापीठाने सहा सुवर्ण, १० रौप्य आणि एक कांस्य पदकांची कमाई करून चमकदार कामगिरी केली आहे. राजभवनद्वारे आयोजित ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये राज्यातील २३ विद्यापीठे सहभागी झाली होती.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय समूह गायन, पाश्चिमात्य समूह गायन, पाश्चिमात्य एकल गायन, पाश्चिमात्य वाद्यवादन आणि मूकनाट्य या विभागातील स्पर्धांमध्ये सहा सुवर्ण पदके पटकावत निर्विवाद वर्चस्व मिळविले. यासह भारतीय शास्त्रीय तालवाद्य, लोकवाद्यवृंद, नाट्य संगीत, भारतीय शास्रीय नृत्य, भारतीय लोक नृत्य, एकांकिका, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, वादविवाद आणि छायाचित्रण या स्पर्धांमध्ये १० रौप्य, तर भित्तीपत्र स्पर्धेत एक कांस्य पदक पटकावले.

संगीत, साहित्य, नृत्य आणि नाट्य या गटांतील स्पर्धांमध्ये विजयी सलामी देऊन आणि सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने १११ गुणांची कमाई करून अव्वल स्थान कायम ठेवले. निधी खाडीलकर आणि हर्ष नकाशे या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन सर्वाधिक बक्षिसे मिळवून ‘गोल्डन गर्ल’ आणि ‘गोल्डन बॉय’ चा किताब मिळवला. विद्यापीठाच्या ५५ विद्यार्थ्यांच्या संघानी या सर्व कलाप्रकारात सहभाग घेतला होता.

मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावरील विजेते व माजी विद्यार्थी तुषार शिरसाठ, मयूर मगरे, केशर चोपडेकर, विलास रहाटे, आशिष पवार, साहिल जोशी, सागर चव्हाण, महेश कापरेकर, अभिजीत मोहिते,

रोहन कोठेकर, अमोल बावकर, गणेश कांबळे, महेश गुरव आणि विवेक वारभुवन यांनी मार्गदर्शन केले. चमू व्यवस्थापक म्हणून डॉ राहुल शेट्टी आणि विवेक वारभुवन यांनी काम पाहिले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांनी यशस्वीरित्या या स्पर्धेचे नियोजन केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य. डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी विजयी चमूचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘इंद्रधनुष्य’ राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवात निर्विवाद वर्चस्व मिळवून विजेतेपदाचा बहुमान मिळवणे हे अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवाची बाब आहे. हे विजेतेपद म्हणजे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, परिश्रम आणि संघभावनेचे उत्तम प्रतीक आहे. स्पर्धेच्या २१ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तब्बल २० वेळा अंतिम विजेतेपदाचा चषक राखण्याचा बहुमान मिळविणे हे विद्यापीठाच्या सांस्कृतिक समृद्धीची साक्ष देणारे आहे. – प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ