मुंबई : नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर ठरणाऱ्या मुंबई विद्यापीठाअंतर्गतच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गतच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील सर्व अभ्यासक्रमांसाठी https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने २० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर प्रवेश प्रक्रियेसंबंधित सर्व तपशील आणि माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
‘आयडॉल’तर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी किमान पात्रता धारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. तर यंदा ‘आयडॉल’मध्ये पहिल्यांदाच पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविण्यात येत आहे. तसेच पहिल्यांदाच ‘एम. ए. समाजशास्त्र’ हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येत आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रवेश प्रक्रिया ते परीक्षा ही सर्व प्रकिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.
कोणकोणते अभ्यासक्रम?
पदवी स्तरावरील अभ्यासक्रम : बी.ए.अंतर्गत इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी, आणि इंग्रजी या विषयांचा समावेश आहे. बी.कॉम. अंतर्गत वाणिज्य, अकाउंटसी, आणि बिझनेस मॅनेजमेंट, अकाऊंट अँड फायनान्स हे अभ्यासक्रम असतील. बी.एस्सी. अंतर्गत माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र या अभ्यासक्रमांचा समावेश असेल.
पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम : एम.ए. अंतर्गत इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क हे अभ्यासक्रम असतील. एम. कॉम. अंतर्गत ॲडव्हान्स अकाउंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम असतील. एम.एस्सी. अंतर्गत गणित, माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, ‘एमएमएस’ आणि ‘एमसीए’ हे अभ्यासक्रम असतील. याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन फिनान्शिअल मॅनेजमेंट (पीजीडीएफएम) या अभ्यासक्रमाचाही समावेश आहे.