सातही तलावांत ९५ टक्के पाणीसाठा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत ९५ टक्के जलसाठा झाल्याने सध्या मुंबईत लागू केलेली १० टक्के पाणीकपातही मागे घेण्यात आली आहे. शनिवारी, २९ ऑगस्टपासून पाणीपुरवठा पूर्ववत होईल.

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या उध्र्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या महिनाभरात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठय़ात वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजता सातही तलावांतील एकूण जलसाठा १३,७७,६९० दशलक्ष लिटर म्हणजेच ९५.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे ५ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेली पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर संबंधित गावांचा पाणीपुरवठाही नियमित केला जाणार आहे.

जून व जुलै महिन्यात तलाव क्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस झाला होता. जुलैअखेरीस तलावांमधील एकूण जलसाठा केवळ ३४ टक्क्य़ांवर आला होता. त्यामुळे पालिकेने २० टक्के पाणीकपात लागू केली होती. त्यानंतर तलाव क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे २१ ऑगस्टला पाणीकपात १० टक्क्यांवर आणण्यात आली. तलाव क्षेत्रात सातत्याने पावसाने हजेरी लावल्याने जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली.

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा लागतो. त्यासाठी सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असणे आवश्यक आहे. सातही तलावांत मिळून १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा होणे आवश्यक असते.

वर्ष        पाणीसाठा

२०२०      १३,७७,६९० दशलक्ष लि. (९५.१९टक्के)

२०१९      १३,९५,६६३ दशलक्ष लि. (९६.४३टक्के)

२०१८      १३,७३,४५५ दशलक्ष लि.(९४.८९टक्के)

तलाव          पाणीसाठा        टक्केवारी

उध्र्व वैतरणा    २,०२,७९६       ८९.३२टक्के

मोडकसागर     १,२८,९१०       ९९.९९ टक्के

तानसा          १,४४,२४०          ९९.४२ टक्के

मध्य वैतरणा    १,८३,८०६       ९४.९८टक्के

भातसा           ६,८२,१९४           ९५.१४ टक्के

विहार               २७,६९८            १०० टक्के

तुळशी               ८,०४६              १०० टक्के

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai water cut completely canceled zws
First published on: 29-08-2020 at 01:59 IST