मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी एक मोडक सागर बुधवार, ९ जुलै रोजी सकाळी ६.२७ च्या सुमारास पूर्ण भरून ओसंडून वाहू लागला. या तलावाचा एक दरवाजा १ फूट उघडण्यात आला असून प्रति सेकंद १०२२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा ७२.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. यंदा लवकर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होते आहे.

दोनच दिवसांपूर्वी ९० टक्के भरलेल्या मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. मध्य वैतरणा धरणातून सोडण्यात येणारे पाणी मोडक सागर (निम्न वैतरणा) जलाशयात साठविले जाते. त्यामुळे मोडक सागर धरणही पूर्ण भरले आहे. मोडक सागर धरणाची कमाल पाणी साठवण क्षमता १२,८९२.५ कोटी लिटर (१,२८,९२५ दशलक्ष लिटर) इतकी आहे. हे धरण दरवर्षी जुलैच्या अखेरीस भरते. यंदा हे धरण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ओसंडून वाहू लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता १ लाख ४४ हजार ७३६.३ कोटी लिटर (१४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर) इतकी आहे. बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी पहाटे ६ वाजता सात धरणांमध्ये एकूण ७२.६१ टक्के इतका जलसाठा आहे. २०२४ मध्ये याच दिवशी सात धरणांमध्ये २०.४८ टक्के पाणीसाठा होता, तर २०२३ मध्ये याच दिवशी २३.११ टक्के पाणीसाठा होता. गेल्या दहा वर्षांतील हा सर्वाधिक पाणीसाठा आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा

  • उर्ध्व वैतरणा – ७३. १८टक्के
  • मोडक सागर – ९९.९९टक्के
  • तानसा – ७७.६० टक्के
  • मध्य वैतरणा – ९३.१५ टक्के
  • भातसा – ६२. १७टक्के
  • विहार – ४७. ९७टक्के
  • तुळशी – ४८.५३ टक्के