मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी मध्यरात्रीपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात पावसाबरोबरच जोरदार वारे वाहत आहेत. दरम्यान, मुंबईसह ठाण्यात आज सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आज दिवसभर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

मुंबईत सध्या संततधार पाऊस कोसळत आहे. काही वेळ विश्रांती घेतलेल्यानंतर पुन्हा पाऊस जोर धरतो. शहर आणि उपनगरांत मंगळवारी मध्यरात्रीपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. पवई, अंधेरी, वांद्रे, कांदिवली, भायखळा, लालबाग या भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. या परिसरात मध्यरात्रीपासून पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईला बुधवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत बुधवारी दिवसभर पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. मुंबईबरोबरच ठाणे, पालघर भागातही आज अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवारी पहाटे ५.३० पर्यंत झालेला पाऊस

विक्रोळी – २२३.५ मिमी

सांताक्रूझ – २०६.६ मिमी

भायखळा – १८४.५ मिमी

जुहू – १४८.५ मिमी

वांद्रे – १३२.५ मिमी

कुलाबा – १००.२ मिमी

आज पावसाचा इशारा कुठे

अतिमुसळधार पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक घाट परिसर

अतिवृष्टी

रायगड , पुणे घाट परिसर , कोल्हापूर घाट परिसर

मेघगर्जनेसह पाऊस

सिंधुदुर्ग, धुळे , अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

राज्याची स्थिती

संपूर्ण राज्यात सध्या पाऊस सक्रिय आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी आहेत. पुराच्या पाण्यात वाहून जाणे, दरड कोसळून किंवा घर पडून झालेल्या दुर्घटानांमध्ये हे मृत्यू झाले आहेत. पुरामुळे सुमारे दीड हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले असून त्यामध्ये ठाणे जिह्यातील ६१०, तर पालघरमधील ५०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

पावसाची विश्रांती कधी?

मुंबईसह ठाणे, पालघर भागात बुधवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा तर, रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उर्वरित भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. साधारण पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून साधारण शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होईल.