मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून काही भागात गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत मुसळधार पाऊस कोसळून काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सकाळी जारी केलेल्या सुधारित अंदाजानुसार मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत मागील तीन – चार दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. शहर तसेच उपनगरात बऱ्यापैकी पाऊस कोसळत आहे. काही भागात गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. नरिमन पॉइंट, दादर, वरळी, परळ, शीव, कुर्ला याचबरोबर घाटकोपर, पवई, भांडूप या परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर गुरुवारी पहाटेपासून कायम आहे. दरम्यान, पुढील काही तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. प्रामुख्याने दक्षिण मुंबईत पावसाचा जोर राहील.
ठाणे, नवी मुंबईत मुसळधार
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही बुधवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या भागात पावसाचा जोर अधिक होता. अधूनमधून वारे वाहत होते. आज पहाटेपासून पुन्हा या भागात पावसाने जोर धरला आहे.
आज पावसाचा अंदाज कुठे
अति मुसळधार पावसाचा अंदाज (ऑरेंज अलर्ट)
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर</p>
मुसळधार पावसाचा अंदाज (यलो अलर्ट)
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, चंद्रपूर,गडचिरोली, आणि भंडारा
हलक्या सरींचा अंदाज
मराठवाडा
मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण
मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी संपूर्ण गुजरात, तसेच संपूर्ण छत्तीसगड आणि झारखंड व्यापला. याचबरोबर राजस्थानच्या काही भागात मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली आहे. मध्य प्रदेशचा काही भाग, पूर्व उत्तर प्रदेशचा काही भाग आणि बिहारच्या बहुतांश भागात मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली आहे. मोसमी वाऱ्यांची सीमा गुरुवारी बारमेर, जोधपूर, जयपूर, ग्वालिअर, खजुराहो, सोनभद्रा आणि गया भागात होती. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मोसमी वारे राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश आणि बिहारच्या उर्वरित भागात प्रगती करतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.