मुंबई : आपल्या बहिणीचे ४० वर्षीय इसमाशी असलेले प्रेमसंबंध सहन न झाल्याचे एका तरुणाने बहिणीच्या प्रियकाराची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी तरूण स्वत: पोलिसांकडे हजर झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

आशिष जोसेफ शेट्टी (२१) हा नृत्यदिग्दर्शक असून मालाड येथे राहतो. त्याची बहिण एंजेला जोसेफचे (२४) जोगेश्वरीत राहणाऱ्या नितीन सोलंकीसोबत (४०) प्रेमसंबंध होते. नितीन वयस्कर होता, तसेच तो खासगी रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करीत होता. याशिवाय तो वेगळ्या धर्माचा होता. त्यामुळे आशिषचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. आशिष मालाडच्या मार्वे रोड खाडीजवळील टी जंक्शन येथे शनिवार, ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता नितीन सोलंकीला भेटला. माझ्या बहिणीचा नाद सोड असे आशिषने नितीनला सांगितले. त्यावरून दोघांचे भांडण झाले. वाद विकोलापाला गेल्यावर आशिषने जवळ असेलल्या लाकडी दांड्याने नितीनच्या डोक्यात प्रहार केला. त्यानंतर रक्तस्त्राव होऊन नितीन बेशुध्द पडला.

पोलिसांकडे आत्मसमर्पण

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नितीनला सोडून आशिष मालवणी पोलिसांकडे गेला आणि त्याने नितीन सोलंकीला मारल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेतली. नितीनला रुग्णवाहिकेतून कांदिवली पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना दुपारी २ वाजता डॉक्टरांनी नितीनला मृत घोषित केले.

प्रेमसंबंधाला विरोध असल्याने हत्या

नितीन सोलंकी जुहू येथील एका रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करीत होता. त्याची आई जया सोलंकीने (५४) याप्रकरणी मालवणी पोलिसांमध्ये जबाब नोंदवला. नितीन आणि एंजला यांचे प्रेमसंबंध होते. त्याला एंजलाचा भाऊ आशिषचा विरोध होता. हे प्रेमसंबंध तोडून टाकण्यासाठी तो बहिणीवरही दबाव टाकत होता. त्याच विरोधातून आशिषने नितीनची हत्या केल्याचे सोलंकी यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. या जबाबावरून मालवणी पोलिसांनी आरोपी आशिष याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आशिष याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली.