मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील तापमानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे लहान मुले आजारी पडू लागली आहेत. लहान मुले सर्दी, खोकला व तापाने त्रस्त झाली आहेत. लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच वयस्क नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजाराचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

सकाळी थंडी व दुपारी वाढते तापमान असा वातावरणात बदल होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत असल्याचे निदर्शनास आले आहे. लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप याबरोबरच छातीमध्ये घरघर, सुका खोकला होत असल्याचे आढळून येत आहे. आठवडाभरामध्ये लहान मुले आजारी पडण्याच्या प्रमाणात साधारणपणे ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील कान – नाक – घसा विभागातील सहाय्यक मानदसेवी डॉ. धीरजकुमार नेमाडे यांनी दिली. त्याचप्रमाणे वयस्क व्यक्तींमध्येही संसर्गजन्य आजाराचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. संसर्ग हाेणाऱ्या नागरिकांमध्ये शिंका येणे, नाकातून पाणी वाहणे, नाकात खाज येणे, डोळ्यातून पाणी वाहणे आणि घशामध्ये खवखव होणे असा त्रास होत असल्याचे डॉ. नेमाडे यांनी सांगितले. लहान मुलांना १०० पेक्षा जास्त ताप असेल आणि तातडीने डॉक्टरकडे जाणे शक्य नसेल तर त्याला पाण्यांनी वारंवार पुसून घ्यावे. जेणेकरून त्याला आकडी येणार नाही. लहान मुलांना काही दिवस शाळेत पाठवू नये, तसेच घरातील बुरशी तयार झाली असल्यास ती तातडीने साफ करावी, असा सल्लाही नेमाडे यांनी दिला.

हेही वाचा…घाटकोपरमधून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वातावरण खराब होत असल्याने नागरिक संसर्गजन्य आजाराने त्रस्त झाले आहेत. खोकला, सुका खोकला, सर्दी आणि संसर्ग होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत साधारणपणे ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. लहान मुले सर्दी, खोकल्याबरोबरच तापाने मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. लहान मुलांबरोबरच वृद्ध नागरिक आणि ३० ते ५० वयोगटातील मधुमेह, रक्तदाब या सहव्याधी असलेल्या तरुणांना बदलत्या वातावरणाचा त्रास होत आहे. तरुणांमध्ये संसर्गजन्य आजार झालेले रुग्ण आढळत असल्याची माहिती नायर रुग्णालयातील कान – नाक – घसा विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. बच्ची हाथीराम यांनी दिली. पहाटे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रदुषके असतात, त्याचा त्रास नागरिकांना अधिक होत असतो. त्यामुळे त्यांनी पहाटे लवकर चालायला किंवा धावायला जाण्याऐवजी ९ ते १० दरम्यान प्रदूषण कमी झाल्यावर जावे, त्याचप्रमाणे सायंकाळी ५ ते ६ दरम्यान जावे, असा सल्ला डॉ. हाथीराम यांनी दिला.
वाढती थंडी आणि प्रदूषण यामुळे मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये लहान मुलांबरोबरच सहव्याधी असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पुढील काही दिवस वातावरण असेच राहिल्यास रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कान – नाक – घसा रुग्णालयातील सहाय्यक मानदसेवी डॉ. जयेश राणावत यांनी सांगितले. त्यामुळे लहान मुलांना घराबाहेर नेताना मास्कचा वापर करावा. तसेच बांधकाम क्षेत्र व रस्त्यावरील सिग्नलच्या जागी जाणे टाळावे, असा सल्ला राणावत यांनी दिला.