मुंबईसाठी समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका व मे. आय.डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यादरम्यान करण्यात आला. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधत महापालिकेच्या या करारावर संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेनं समुद्रातील खाऱ्या पाण्याचं गोड पाणी करणारा अर्थात नि:क्षारीकरण करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका व मे. आय.डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यादरम्यान २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला. या प्रकल्पावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला.

हेही वाचा- मुंबईजवळच्या ‘या’ बेटावर विकसित होणार पिकनिक स्पॉट!

“करोनातून जीव वाचेल का? कामाला जाता येईल का? पगार मिळेल का? चूल पेटेल का? लॉकडाऊन संपेल का? मुंबईकरांसमोर जगण्याचे असे असंख्य प्रश्न तर मुंबईचे सत्ताधारी कंत्राटांची खैरात वाटण्यात मग्न! लुटमार!! कधी नाल्यातील गाळाच्या नावाने तर आता समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या बहाण्याने!,” असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं.

ही आहेत प्रकल्पाची वैशिष्टय़े

१) २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा भविष्यात ४०० दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत विस्तार करण्याची क्षमता.

२) मे २०२२ पर्यंत प्रकल्प अहवाल तर २०२५ मध्ये प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा. याद्वारे मुंबईकरांना २०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी

३) अनियमित-लहरी पाऊस, वातावरणीय बदल यामुळे मुंबईकरांना दरवर्षी १५ ते २० टक्के पाणीकपातीस सामोरे जावे लागते या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्णपणे विश्वासार्ह जलस्रोतांचा विकास

४) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून मनोरी, मालाड येथे उपलब्ध करून दिलेल्या जागेवर प्रकल्पाची अंमलबजावणी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून कमी जागेत प्रकल्प उभारणी.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais water bmc to set up a desalination plant uddhav thackeray ashish shelar bmh
First published on: 29-06-2021 at 11:03 IST