तसं पाहायला गेलं तर मुंबईकरांसाठी किंव जिवाची मुंबई करणाऱ्या बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील मुंबईत भेट देण्यासारखी भरपूर ठिकाणं आहेत. मात्र, आता मुंबईकर आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील एक भन्नाट पर्याय मुंबईजवळच तयार होणार आहे. मुंबईजवळचं न्हावा बेट पिकनिक स्पॉट म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. CIDCO च्या माध्यमातून हे काम केलं जात असून त्यासाठी लोकांच्या प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत. उलवेपासून न्हावा बेटाचं अंतर अवघं ५ किलोमीटर असल्यामुळे भविष्यात हा पिकनिक स्पॉट पूर्णपणे विकसित झाल्यानंतर सगळ्यांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडको अर्थात City and Industrial Development Corporation of Maharashtra ने आत्तापर्यंत नवी मुंबईचे १४ नॉड्स विकसित केले आहेत. यापैकी ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरूळ आणि सीबीडी बेलापूर हे उत्तरेकडे तर खारघर, कामोठे, कळंबोली, पुष्पक, पनवेल, उलवे आणि द्रोणगिरी यांचा त्यात समावेश होतो. आता न्हावा बंदर देखील पिकनिक स्पॉट किंवा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याची कामगिरी सिडकोकडे असून त्यासंदर्भात रविवारी सिडकोने विकासकांकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत.

न्हावा बेटावर ६० हेक्टर जागा CIDCO कडे

उलवेपासून ५ किलमीटरवर असणाऱ्या न्हावामध्ये सिडकोकडे अंदाजे ६० हेक्टर जागा आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे न्हावा थेट शिवडीशी जोडलं जातं. तसेच, उलवेशी देखील न्हावा जोडलं गेलं आहे. सिडकोच्या ताब्यात असणारी ६० हेक्टर जागा न्हावा बंदराच्या किनारी भागात आहे. त्यामुळे कोस्टल रेंज रेग्युलेशनची तिथे परवानगी लागू आहे. नवी मुंबई विकास आराखड्यानुसार हा भाग रिजनल पार्क झोनमध्ये येतो. सिडकोनं जारी केलेल्या पत्रकानुसार न्हावा बेटावरील हा पूर्ण भाग पर्यटन विकासासाठी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी किंवा पिकनिक स्पॉट म्हणून चांगल्या प्रकारे विकसित करता येऊ शकतो.

शिवडी-न्हावाशेवा सागरी पूल सप्टेंबर २३ मध्ये होणार पूर्ण!

यासंदर्भात गुंतवणूकदारांना आणि विकासकांना आकर्षित करण्यासाठी सिडकोनं हे पत्रक काढलं असून त्यामध्ये या प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गुंतवणूकदार आणि विकासकांनी २९ जुलै २०२१ पर्यंत यासंदर्भातल्या आपल्या निविदा सादर करण्याचे देखील या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco decided to develop picnic spot on nhava island near navi mumbai pmw
First published on: 28-06-2021 at 19:24 IST