मुंबई : मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कामगारांसाठी घरे बांधण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. कामगार कल्याण योजनेचा एक भाग म्हणून आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. तसेच, कामगारांना वाढीव क्षेत्रफळाची (३०० चौ.फूट) घरे उपलब्ध करून देण्याबाबत पालिकेने नियोजन केले आहे. आतापर्यंत ५ हजार ५९२ कामगारांना घरे देण्यात आली असून आगामी वर्षात १२ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. आतापर्यंत या योजनेचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

संपूर्ण शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांना कामाचे विशिष्ट स्वरूप व तेथील वातावरणामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच, त्यांच्यात मृत्युदराचेही प्रमाण अधिक आहे. ही समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रानजीक कर्मचारी निवासस्थानाच्या रूपात उत्तम निवासव्यवस्था पुरविणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेने आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांसाठी घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेत सद्यस्थितीत २७ हजार ९९२ कामगार कार्यरत आहेत. आतापर्यंत यापैकी सुमारे ५ हजार ५९२ कामगारांना सेवा निवासस्थाने देण्यात आली आहेत. आश्रय योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांच्या ४६ पैकी ३० वसाहतींचा पुनर्विकास केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या योजनेअंतर्गत ३० वसाहतींच्या प्रस्तावित पुनर्विकासाद्वारे सफाई कामगारांना वाढीव क्षेत्रफळाची (३००चौ. फूट) सुमारे १२ हजार निवासस्थाने उपलब्ध करून देण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे. तसेच पालिकेने ३० ठिकाणच्या पुनर्विकासासाठी कार्यादेश दिले आहेत. त्यापैकी २३ ठिकाणी कामे सुरू करण्यात आली आहेत, तर उर्वरित ७ ठिकाणची कामे लवकरच हाती घेण्यात आली आहेत. आश्रय योजनेसाठी २०२४ – २५ मध्ये ८५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. महापालिकेने आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी १३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.