मुंबई : महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाच्या हद्दीत पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने ठेवले असून पुलाच्या पूर्व बाजूकडील सर्व कामे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. या उड्डाणपुलाच्या निर्मितीमध्ये रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या सुमारे १०० मीटर लांबीच्या मुख्य पुलाचा समावेश आहे.
महानगरपालिकेच्या पूल विभागातर्फे बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका मुख्यालयातील बैठकीत आढावा घेतला. दरम्यान, प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. संबंधित पुलाच्या पश्चिम बाजूकडील बाधित बांधकामांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यानंतर त्याचे निष्कासन करण्यात यावे. पुढील ५ महिन्यांत पुलाची उर्वरित कामे जलद गतीने मार्गी लावून बाधित व्यक्तींचे पर्यायी घरे देऊन पुनर्वसन करावे, असे स्पष्ट आदेश बांगर यांनी दिले.
लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एकूण दोन मार्गिकांचा आहे. एकूण ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग बांधण्यात येत आहे. या उड्डाण पुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर जाण्यासाठी जोडमार्ग बांधण्यात येत आहे. त्यासोबतच दोन्ही बाजूला रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जीना यांची देखील पुनर्बांधणी या प्रकल्पांतर्गत केली आहे. त्याचप्रमाणे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवा मार्ग समाविष्ट आहे. सेवा मार्गाच्या कामाचा भाग म्हणून पूर्व बाजूला सोमय्या नाला पुनर्बांधणी देखील करण्यात आली आहे. या उड्डाणपुलासाठी प्रत्येकी तब्बल १,१०० मेट्रिक टन वजन आणि सुमारे १०० मीटर लांबीचे दोन गर्डर यशस्वीपणे स्थापन करण्यात आले आहेत.
दुसऱ्या टप्प्यामध्ये पुलाच्या पूर्व व पश्चिम बाजूंकडील १७.५० मीटर रुंदीच्या पोहोच रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे संपूर्ण काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन आहे. त्यापूर्वी पूर्व बाजूकडील बहुतांशी कामे नियोजित कालमर्यादेत म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे बांगर यांनी सांगितले. त्यात नाल्याच्या बाजूकडील उपरस्त्याच्या रूंदीकरण कामाचा समावेश आहे. मात्र, काही बांधकामांमुळे अडथळा निर्माण होत आहे. संबंधित पुलाच्या पश्चिम बाजूकडील बाधित बांधकामांच्या पुनर्वसन कामाला विलंब झाल्यास २०२६ च्या पावसाळ्यापूर्वी पूल सुरू करणे शक्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुनर्वसन व निष्कासनाचे काम येत्या २ ते ३ महिन्यांत पूर्ण करावे. यादरम्यान पुलाच्या कामात अवरोध ठरणारी जलवाहिनी, सांडपाणी नलिका यांच्या स्थलांतरणाची कामे हाती घ्यावीत, असे आदेश बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.