तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये समोर आला आहे. हत्येनंतर मृतदेह नाल्यात टाकण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी एका तृतीयपंथीयासह दोन जणांना अटक केली आहे. तृतीतयपंथीयाने मुलीच्या पालकांकडून पैसे, नारळ आणि साडीची मागणी केली होती, पण ते न दिल्याने हे कृत्य करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दक्षिण मुंबईतील कॅफे परेडमध्ये ही घटना घडली. गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सकाळी नाल्यात सापडला तेव्हा ही घटना समोर आली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तृतीयपंथीयासह दोघे आरोपी मुलीला आशीर्वाद देण्यासाठी घरी गेले होते. त्या बदल्यात त्यांनी भेटवस्तू, पैसे, नारळ आणि साडी मागितली. पण मुलीच्या आई वडिलांनी ते देण्यास नकार दिला.
त्यानंतर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यानंतर आरोपींनी गुरुवारी सायंकाळी मुलीचे अपहरण केले आणि तिला नाल्यात फेकले. कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला होता तसेच पोलिसांत तक्रारही दिली होती. सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर खुनाचे कलमही लावण्यात आले.
“गुरुवारी संध्याकाळी कानू नावाचा तृतीयपंथी आमच्या घरी आला होता. त्याने आमच्याकडे २००० रुपयांची मागणी केली होती. आम्ही कानूला पैसे दिले नाही आणि तिला मुलीच्या नामकरण सोहळ्याच्या दिवशी येण्यास सांगितले. त्यानंतर कानूने आम्हाला धमकावले आणि तेथून निघून गेला अशी:,माहिती मुलीचे आजोबा चंद्रकांत यांनी दिली.
“कानूने पोलिसांना सांगितले की कुटुंबियांनी केलेले आरोप खोटे आहेत. पण तपासादरम्यान त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि खून करण्यात मदत करणाऱ्या एका साथीदारचे नाव त्याने सांगितले आहे, ”असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर, कुशल, सोनू अशी ओळख असलेल्यालाही अटक करण्यात आली.