मुंबई : नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ८६४ घरांच्या चावी वाटपाचा बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी होणारा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला असून आता हा कार्यक्रम लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. यासाठी कोणतेही कारण अद्याप म्हाडाकडून देण्यात आलेले नाही. हा कार्यक्रम कधी होणार याबाबतही कोणतीही स्पष्टता नाही.

म्हाडाचे मुंबई मंडळ वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास करीत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत तिन्ही ठिकाणी पहिल्या टप्प्यात पुनर्वसित इमारतींची कामे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच वरळीतील पुनर्वसित इमारतीतील ५५६ घरांचा ताबा देण्यात आला आहे. आता नायगाव बीडीडीतील पहिल्या टप्प्यातील तीन पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण झाले असून यापैकी ८६४ घरांना निवासी दाखलाही प्राप्त झाला आहे.

त्यामुळे घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मुंबई मंडळाने यासाठी जय्यत तयारी सुरु केली होती. तयारी अंतिम टप्प्यात असतानात सोमवारी रात्री उशीरा हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांकडून रद्द करून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती म्हाडाला प्राप्त झाल्याचे मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र हा कार्यक्रम का रद्द करण्यात आला याचे कोणतेही कारण म्हाडाकडून देण्यात आलेले नाही.

याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, दिल्लीमध्ये एका मोटारीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांच्या सुरक्षिततेचा आढावा मुख्यमंत्री घेत आहेत. या कारणाने मुख्यमंत्र्यांनी चावी वाटप कार्यक्रम पुढे ढकलला असावा अशी चर्चा आहे. तसेच भाजपचेही मंगळवारचे काही कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाविषयी

नायगाव बीडीडी चाळ अंदाजे १३ एकर जागेवर वसली असून यात ४२ इमारतींचा समावेश आहे. या ४२ इमारतींमध्ये ३३४४ सदनिका आहेत. त्यानुसार येथील ३३४४ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात काही पुनर्वसित इमारतींची कामे सुरू आहेत. येथील पुनर्वसित इमारती २२ मजली असून यातील घरे ५०० चौरस फुटांची आहेत. पहिल्या टप्प्यातील ८६४ घरांचे काम पूर्ण होऊन त्यांना निवासी दाखला मिळाला आहे. आता या घरांच्या चावी वाटपाची प्रतीक्षा रहिवाशांना आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात सेवानिवृत्त आणि सध्या सेवेत असलेल्या ४२३ पोलिसांना प्रथमच १५ लाख रुपये घेऊन हक्काचे ५०० चौरस फुटांचे घर वितरीत केले जणार आहे. त्यामुळे हा टप्पा वैशिष्ट्यपूर्ण मानला जात आहे.