मुंबई : नायर दंत महाविद्यालयात दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी वाढत असून रुग्णांना अद्ययावत आरोग्य सेवा देता यावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयाच्या आवारात ११ मजली विस्तारित इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता. या इमारतीचे बांधकाम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस असून त्यानंतर तात्काळ ही इमारत रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णांना दातासंदर्भातील आजाराबाबत चांगले उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

नायर रूग्णालय दंत महाविद्यालयात सरासरी ३५० ते ४०० रुग्ण उपचार घेतात. तर काही वेळा ६५० ते ८०० रुग्णांवर उपचार होतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन २०१८ मध्ये नायर दंत महाविद्यालयाच्या आवारातच ११ मजली विस्तारित इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, इमारतीमधील विविध विभागांमधील फक्त फर्निचरचे काम सुरू आहे. कंत्राटदार या इमारतीमधील उर्वरित कामे युद्धपातळीवर आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे दिवाळीनंतर ही इमारत रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल होईल, अशी माहिती नायर महाविद्यालय व दंत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. निलम अंद्राडे यांनी दिली. नवीन विस्तारित इमारतीमुळे रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच प्रतीक्षा कालावधीही कमी होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा >>>कांजूरमार्ग कारशेडच्या कामासाठी १५ दिवसांत निविदा मागवणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे असणार विभाग

अकरा मजली इमारतीमध्ये पहिले सहा मजले रुग्ण सुविधेसाठी असणार आहेत. तर उर्वरित ७ ते ११ मजले विद्यार्थी वसतिगृहासाठी देण्यात येणार आहेत. पहिल्या मजल्यावर आस्थापना कार्यालय, अधिष्ठाता कार्यालय, दुसऱ्या मजल्यावर रुग्णांसाठी कक्ष, विशेष रुग्ण कक्ष, संसर्ग कक्ष, ३ अद्ययावत शस्त्रक्रियागृह तिसऱ्या मजल्यावर फॅन्टम आणि सिम्युलेटर प्रयोगशाळा, चौ‌थ्या मजल्यावर कृत्रिम दंत व दात भरण विभाग, पाचव्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी वर्ग कक्ष, सभागृह, सहाव्या मजल्यावर चिकित्सापूर्व विद्यार्थी प्रशिक्षण प्रयोगशाळा, सातव्या मजल्यावर सर्व सुविधायुक्त उपहारगृह आणि आठ ते ११ व्या मजल्यापर्यंत विद्यार्थ्यांसांठी वसतिगृह असणार आहे.