ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकच्या विशेष तपास पथकाकडून अटक करण्यात आलेले आरोपी अमोल काळे, अमित बद्दी आणि गणेश मिस्त्रे यांना शनिवारी महाराष्ट्र एटीएसने मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी कोर्टाने या तिघांना १२ ऑक्टोबरपर्यंत एटीएसची कोठडी सुनावली. नालासोपारा स्फोटकं प्रकरणी एटीएसला त्यांची चौकशी करायची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती समोर आली होती. अमोल काळेच्या डायरीत काही नावं लिहून ठेवण्यात आली होती. ही नावं त्यांचं पुढील टार्गेट होती. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयकडून मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, अमोल काळेच्या डायरीत एकूण सहा नावं होती. यामधील चार जण ठाण्यातील तर एक जण उत्तर प्रदेशातील आहे तर सहावं नाव मुंबई एसपी असं लिहिण्यात आलं होतं.

मुंबई एसपी हे नाव एसपी नंदकुमार नायर यांचं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कारण नंदकुमार नायर यांनीच नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पहिली अटक केली होती. त्यांनी विरेंद्र तावडेला अटक केल्यापासून टार्गेटवर असल्याची माहिती आहे. अमोल काळे आणि विरेंद्र तावडे यांनीच मिळून दाभोलकरांच्या हत्येचा कट आखल्याचं बोललं जात आहे.

गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी अमोल काळे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्याकटात सामील असल्याची माहिती तपासातून उघड झाली होती. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक झालेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवले असल्याची माहिती सीबीआयच्यावतीने न्यायालयात देण्यात आली होती. सीबीआयने अमोल काळेला ताब्यात घेतले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nalasopara explosive case amol kale amit baddi ganesh mistre have been sent to ats custody till 12 october
First published on: 06-10-2018 at 16:49 IST