काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली आहे,” असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील, तर हे गंभीर असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे, असं म्हणत पटोलेंनी फडणवीसांवर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित राहिले नाही. काँग्रेस आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करा,” अशी मागणी नाना पटोलेंनी केली.

“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची खुलेआम दादागिरी”

नाना पटोले म्हणाले, “आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. शिंदे फडणवीस सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदारच खुलेआम दादागिरी करत आहेत, हातपाय तोडण्याची धमकी दिली जाते, गोळीबार केला जातो, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनीधींची सुरक्षा काढून घेतल्या आहेत.”

“महिला आमदारावर हल्ला झाला तरी गृहमंत्र्याची प्रतिक्रिया नाही”

“लोकप्रतिनिधींना लोकांमध्ये जावे लागते, त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, विविध कार्यक्रमासाठी त्यांना जनतेमध्ये फिरावे लगते, पण असे हल्ले होत असतील, तर लोकप्रतिनीधींनी काम कसे करायचे? पोलीस दल व इतर सरकारी यंत्रणा काय फक्त विरोधी पक्षांच्या नेते व लोकप्रतिनीधींवर कारवाई करण्यासाठी राखीव ठेवल्या आहेत आहे का? एका महिला लोकप्रतिनिधीवर हल्ला झाला तरी राज्याच्या गृहमंत्र्याची एका वाक्याची प्रतिक्रियाही आली नाही हे असंवेदनशिलपणाचे लक्षण आहे,” असं म्हणत नाना पटोलेंनी फडणवीसांना लक्ष्य केलं.

“गुन्हेगारांवर या सरकारचा वचकच राहिलेला नाही”

पटोले पुढे म्हणाले, “आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा गावात हल्ला करण्यात आला. दोन दिवसाआधी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. असे प्रकार वाढत असून गुन्हेगारांवर या सरकारचा वचकच राहिलेला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली असून केवळ सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना सुरक्षा पुरविली जात आहे.”

हेही वाचा : “दादा, मी राजीनामा दिलेला आहे, तो माझा…”,अजित पवारांनी दिली बाळासाहेब थोरातांच्या फोनची माहिती

“महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे, त्याचे जंगलराज करू नका. आमदार प्रज्ञा सातव यांच्या पाठीशी प्रदेश काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनीधींवर पुन्हा हल्ला होणार नाहीत यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावी व आमदार डॉ प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना आणि हल्ल्यामागील मास्टरमाईंडला तातडीने अटक करून अद्दल घडवा,” अशी मागणी पटोलेंनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole comment on attack on congress mlc pradnya satav pbs
First published on: 09-02-2023 at 14:41 IST