मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ताकद नसून भाजपने उमेदवारी दिली, तर मी लोकसभा निवडणूक लढवीन आणि जिंकून येईन, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी असून ही जागा आम्हीच लढणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आणि बेहिशोबी संपत्तीबद्दल सवाल करीत याबाबत केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु असल्याचे सांगितले. भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी सिंधुदुर्गमध्ये व गुरुवारी रत्नागिरीत आयोजित केला आहे. या मतदारसंघातील खासदार विनायक राऊत हे ठाकरे गटाबरोबर असून शिंदे गटाबरोबर फारसे कार्यकर्तेही नाहीत. उलट भाजपकडे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, अन्य संस्था व आमदार असून मतदारसंघात मोठी ताकद असल्याने ही जागा भाजपच लढवेल. मी आतापर्यंत कधीही कोणाकडे उमेदवारी मागितली नाही. पण या मतदारसंघात भाजपच प्रबळ असल्याने आपला उमेदवार असला पाहिजे, असे मत मी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे मांडले आहे. मी शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांच्याविरोधात नाही. पण मला भाजपने उमेदवारी दिली, तर निश्चित लढेन व विजयी होईन, असे राणे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार राणे यांनी घेतला. मोदी यांच्यावर टीका करण्याची ठाकरे यांची योग्यता नाही. ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, विधिमंडळ, संसदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी देताना नेत्यांकडून पैसे घेतले. करोना काळातही नागरिकांना मदत केली नाही. त्यांनी भ्रष्टाचारातूनच बेहिशोबी संपत्ती जमा केली असून त्याची संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. त्यांचा व्यवसाय, कंपनी नसताना दुसरा बंगला बांधण्यासाठी पैसे कुठून आणले, त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय, असे सवाल करीत लोकसभा निवडणुकीनंतर खासदार संजय राऊतही त्यांना सोडून इतरांकडे जातील, असे भाकीत राणे यांनी केले.

मोदी यांना औरंगजेबाची उपमा दिल्याबद्दलही राणे यांनी संताप व्यक्त केला. मोदी यांनी कधीही कोणाला दुखावले नाही. ते जर औरंगजेबासारखे क्रूर वागले असते, तर ठाकरे शिल्लकच राहिले नसते. यापुढे मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत अपशब्द वापरल्यास ध्वनिक्षेपक (माईक) शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला.