मुंबई : नाशिक शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडींचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नाशिक परिक्रम महामार्गाचे (नाशिक रिंग रोड) काम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. हा प्रकल्प मार्गी लावण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही एमएसआरडीसीकडून सुरू होती. पण आता मात्र हा प्रकल्प एमएसआरडीसीऐवजी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) मार्गी लावणार आहे. हा प्रकल्प एमएसआयडीसीला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंबंधीचा शासननिर्णय प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा आहे.
मागील काही वर्षांपासून नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत आहे. नाशिक शहरातील अवजड वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आता शहरातील अंतर्गत रस्ते अपुरे पडत असून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो, त्यावेळी वाहतुकीची समस्या आणखी गंभीर होते. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएसआरडीसीकडून ६६ किमी लांबीचा नाशिक परिक्रमा महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला. एमएसआरडीसीने या महामार्गाचे संरेखन, सविस्तर आराखडा तयार करून इतर कामे पूर्ण केली. प्रकल्प मार्गी लावण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरू असतानाच आता राज्य सरकारने हा प्रकल्प एमएसआरडीसीकडून काढून
एमएसआयडीसीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णयही झाल्याची माहिती एमएसआयडीसीतील सूत्रांनी दिली. एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या निर्णयासंबंधीचा शासननिर्णय प्रसिद्ध झाल्यास यावर शिक्कामोर्तब होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाशिक परिक्रमा महामार्ग ६६ किमीचा असून यासाठी अंदाजे ७५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गासाठी निधी उभारणीचे आव्हान एमएसआरडीसीसमोर होते. एमएसआयडीसीने हा महामार्ग करण्यास उत्सुकता दर्शवली आणि यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) एमएसआयडीसीला निधी देण्यास होकार दिला. अखेर हा प्रकल्प एमएसआरडीसीकडून एमएसआयडीसीला देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता नाशिक परिक्रमा महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी एमएसआयडीसीकडून होणार हे निश्चित. हा महामार्ग आपल्याकडे आल्याने एमएसआयडीसीने महामार्गाचे संरेखन आणि सविस्तर आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती एमएसआयडीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली. आराखडा, संरेखनास मान्यता आणि निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लावला जाणार आहे.
एमएसआरडीसी नाराज
राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएसआरडीसीकडून चार हजार किमीहून अधिक लांबीच्या रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. त्यानुसार यातील एक-एक प्रकल्प एमएसआरडीसीकडून मार्गी लावला जात आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून नाशिक परिक्रमा महामार्ग हाती घेण्यात आला होता. मात्र आता हा प्रकल्प एमएसआयडीसीकडे गेला आहे. एखादा प्रकल्प एमएसआरडीसीने आणयाचा त्यावर काम करत त्याचा आराखडा, संरेखन तयार करायचे आणि त्यानंतर अचानक तो प्रकल्प दुसऱ्या यंत्रणेकडे जातो यावरुन एमएसआरडीसीमध्ये नाराजी असल्याचे समजते. मात्र यावर कोणतेही अधिकारी प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. नाशिक परिक्रमासह अन्य काही प्रकल्पावरही एमएसआयडीसीचा डोळा असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
