मुंबई : रक्तपेढ्यांमधील पायाभूत सुविधा, पद्धती, रक्त संक्रमण सेवा वितरणाचे मूल्यांकन करणे यासाठी आवश्यक असलेल्या डेटा संकलनाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने रक्त संक्रमण सेवेंतर्गत राज्यातील सर्व रक्तपेढ्यांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मूल्यांकन जुलै – ऑगस्ट २०२५ दरम्यान करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या रक्त संक्रमण सेवा उपमहासंचालक कार्यालयाकडून देशभरातील विविध रक्त केंद्रे, रुग्णालये आणि संबंधित संस्थांच्या रक्तपेढ्यांमधील पायाभूत सुविधा, पद्धती, रक्त संक्रमण सेवा वितरणाचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक असलेल्या डेटा संकलनाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्रयस्थ संस्थेने केलेल्या मूल्यांकनातून राज्यातील रक्त संक्रमण सेवांसाठी सध्या वापरण्यात येणाऱ्या प्रणालीतील कमतरता आणि त्यात सुधारणा करण्याची संधी ओळखण्यावर भर देण्यात येणार आहे. यामुळे रक्त संक्रमण सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पंजाब, आसाम या राज्यांमधील रक्तपेढ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या मूल्यांकनासाठी नेमलेली त्रयस्थ संस्था जुलै – ऑगस्ट २०२५ दरम्यान राज्यातील रक्तपेढ्यांना भेटी देणार आहे. या भेटीमध्ये डेटा संकलनासाठी संबंधित नोंदी, अहवाल आणि संबंधित अधिकाऱ्यांची उपलब्धता, आवश्यक सुविधा आदी माहिती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या समितीला सहकर्य करण्याचे निर्देश राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना दिले आहे.

विशेष समितीची स्थापना

राज्यातील रक्तपेढ्यांच्या मूल्यांकनासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या रक्त संक्रमण सेवा उपमहासंचालक कार्यालयाकडून पुनरुत्पादक बायोमेडिसिन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. राजेश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सरकारनेही केले होते मूल्यांकन

काही महिन्यांपूर्वीही राज्य सरकारने अशाच प्रकारचे सर्व रक्तपेढ्यांचे मूल्यांकन करण्याचे आदेश दिले होते. या मूल्यांकनानंतर रक्तपेढ्यांच्या कार्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही किंवा त्यांची प्रगतीही झाली नाही. मात्र गेल्या काही वर्षांत सरकारी रक्तपेढ्यांची स्थिती बिकट झाली आहे. सरकारी रक्तपेढ्यांमधील रक्त संकलनामध्ये मागील काही वर्षांमध्ये घट झाली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन नियुक्ती न हाेणे आणि रक्तपेढ्यांचे खाजगीकरण याचा परिणाम रक्तपेढ्यांच्या कामकाजावर होताना दिसू लागला आहे, असे मुंबई महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.