नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व केंद्रीय परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत. आता केवळ दहा गावातील प्रकल्पग्रस्ताची जमिन संपादन प्रक्रिया शिल्लक राहिली असून राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांना देऊ केलेले पॅकेज चांगले आहे. रोख रकमेपेक्षा प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या जमिनीचा मोबदला भविष्यात अधिक मिळणार आहे. हा प्रकल्प राज्याचा राहिलेला नसून तो आता देशातील महत्वाचा प्रकल्प झाला आहे. त्यामुळेच केवळ नवी मुंबई विमानतळासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १३ नोव्हेंबर रोजी दिल्लीत बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उलवा येथील एका कार्यक्रमात दिली.
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उलवा येथे १७ एकर जमिनीवर उभारण्यात आलेल्या रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे उदघाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, सहप्रभारी शौराज वािल्मकी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव, प्रातांध्यक्ष अभिजित कदम, माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपस्थित होते.
नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी- वडाळा सी लिंक यांच्या मुळे मुंबईतील आर्थिक केंद्र नवी मुंबईत स्थलांतरित होणार असून नवी मुंबई भविष्याची आर्थिक राजधानी असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. विमानतळाच्या टेक ऑफ नंतर येथील प्रकल्प्रग्रस्तांच्या जीवनात क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.
प्रकल्पग्रस्तांचे जूने प्रश्न सोडविल्याशिवाय त्यांचा सिडकोवरील विश्वास वाढणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. गरजेपोटी बांधलेली घरे, साडेबारा टक्के योजनेचे वितरण, यासारखे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. रायगड जिल्ह्य़ातील नयना प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे एक महानगर या ठिकाणी उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रामशेठ ठाकूर क्रीडा संकुलाला काही प्रमाणात वाढीव चटई निर्देशांक वाढवून दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
नेत्यांच्या कोपरखळ्या
रामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत असते तर त्यांना सिडकोचे अध्यक्षपद मिळाले असते असे मत सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी व्यक्त केले. त्याला माणिकराव ठाकरे यांनी चांगल्याच शब्दात उत्तर दिले. हिंदुराव काँग्रेस मध्ये असते तर ते मंत्री असते कारण त्यावेळचे डझनभर मंत्री झाले आहेत, पण हिंदुराव यांना सिडकोच्या अध्यक्षपदात समाधान आहे. असा टोला लागावला.