मागील अनेक आठवड्यांपासून सुरु असणाऱ्या मलिक विरुद्ध वानखेडे वादामध्ये आज मध्यरात्री आणखीन एका फोटोची भर पडल्याचं चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर ट्विटवरुन निशाणा साधलाय. मलिक यांनी दोन व्यक्तींचा फोटो ट्विट केला असून हा फोटो निकाहच्या वेळेच्या असल्याचा दावा करत फोटोमधील व्यक्ती समीर वानखेडे असल्याचा दावा केला जातोय.

नक्की वाचा >> वाशीमधील ‘त्या’ बारचे मालक आपणच असल्याचं सांगत समीर वानखेडे म्हणाले, “मी २००६ पासूनच…”

यापूर्वीही नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या लग्नाचा निकाहनामा, पहिल्या लग्नाच्या वेळेचे फोटो ट्विट करुन वानखेडे यांनी मुस्लीम असल्याचं लपवत खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षणाअंतर्गत आयआरएसमध्ये नोकरी मिळवल्याचा आरोप केलाय. याच आरोपांचा पुरावा म्हणून आता मलिक यांनी वानखेडे यांचा कथित स्वरुपामधील निकाहनाम्यावर स्वाक्षरी करताना फोटो ट्विट केलाय.

नक्की वाचा >> क्रांती रेडकर आणि नवाब मलिकांच्या मुलीमध्ये बाचाबाची; क्रांतीने मलिकांना मारलेल्या टोमण्यावर निलोफर म्हणाली, “ही तडफड…”

“कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?”, अशा कॅप्शनसहीत मलिक यांनी हा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये डावकडे बसलेली व्यक्ती ही समीर वानखेडे असल्याचा दावा करण्यात येतोय. तर या व्यक्तीच्या समोर बसलेली व्यक्ती मुस्लीम धर्मगुरु असून फोटोत दिसणारे वानखेडे हे निकाहनाम्यावर स्वाक्षरी करत असल्याचा दावा करण्यात आलाय. फोटोमध्ये जी व्यक्ती समीर वानखेडे असल्याचा दावा केला जातोय तिने मुस्लीम बांधव घालतात त्याप्रमाणे डोक्यावर गोल टोपी घातल्याचं दिसत आहे.

मलिक यांनी मध्यरात्रीनंतर ट्विट केलेला हा फोटो व्हायरल झाला असून काही तासांमध्ये तीन हजारांहून अधिक वेळा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. मागील महिन्यामध्येच समीर वानखेडे यांनी आपण मुस्लीम पद्धतीने विवाह का केला यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं होतं. “भारत हा पुरोगामी देश आहे त्याचा मला अभिमान आहे. माझी आई मुस्लीम होती, बाबा हिंदू आहेत. मी दोघांवरही खूप प्रेम करतो. माझ्या आईने मुस्लीम पद्धतीने विवाह करण्यास सांगितला तो मी केला. कारण मी आईचा शब्द पाळला, मी गुन्हा केला नाही. ज्या महिन्यात निकाह झाला त्याच महिन्यात मी विशेष विवाह कायद्यानुसार (Special marriage act) नोंदणी करून घेतली. मी जे केलं तो गुन्हा नाहीये,” असं वानखेडे म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मलिक यांनी वानखेडे यांचा वाशीमध्ये एक बार असल्याचा दावा केला होता. वानखेडे यांच्या नावे या बारचा परवाना असल्याचं म्हटलं होतं.