अलीकडेच महाराष्ट्रातील काही भागांत अवकाळी पावसानं झोडपलं आहे. वेगवान वाऱ्यांसह कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. एकीकडे शेती मालाला कवडीमोल किंमत मिळत असताना अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी सरकारकडे मदतीची मागणी करत आहे. अशी एकंदरीत परिस्थिती असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी असंवेदनशील विधान केलं आहे.

‘शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत’, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानावर आता विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे.

हेही वाचा- VIDEO: शीतल म्हात्रेंच्या व्हायरल आक्षेपार्ह व्हिडीओवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यामागे…”

मुंबईत प्रसारमाध्यमांनी अब्दुल सत्तार यांच्या विधानाबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “लोकांचा जीव जाणं, याच्या वेदना आणि दु:ख त्यांच्या घरातील लोकांनाच कळतात. एखादा कर्ता पुरुष किंवा एखादा भाऊ जेव्हा आत्महत्या करतो, तेव्हा ते संपूर्ण घर उद्धवस्त होतं. पण संवेदनाहीन झालेल्या सरकारमधील एक मंत्री बेशरमपणाने सांगतो की, शेतकरी आत्महत्या तर नेहमीच होतात, यात मोठं काय आहे? लाज, लज्जा, शरम काहीच नसलेली माणसं या मृतांची टिंगलटवाळी करून हे दररोजच घडतंय, असं म्हणत त्यांचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणतायत. महाराष्ट्राची जनता हे सगळं बघत आहे. सत्तेची मग्रुरी आणि सत्तेचा माज चांगला नाही, हे येथील जनता दाखवून देईन.”

हेही वाचा- आदित्य ठाकरे विरूद्ध आशिष शेलार, दोन्ही आमदार सभागृहात एकमेकांना भिडले; नेमकं झालं काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय आहे?

मागील काही दिवसांत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असंवेदनशील उत्तर दिलं आहे. ‘शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत’, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.