नाणार रिफायनरीच्या समर्थकांच्या विरोधात बातमी दिल्यामुळे रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आली. भाजपच्या एका कार्यकर्त्याने शशिकांत वारिशे यांना गाडीखाली चिरडले, ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. “महाराष्ट्रात बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केला. महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षित नाहीत. पत्रकारांवर दबाव आणून पाहिजे त्या गोष्टी लोकांसमोर आणायच्या, हा कावा सत्तारुढ पक्षाचा दिसतो. त्यामुळे पत्रकाराला चिरडून मारण्यात आल्याच्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करत आहे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात पार पडली. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टिका केली.

हे वाचा >> राजापूर रिफायनरी समर्थकाविरोधात बातमी दिलेल्या पत्रकाराला त्याच दिवशी गाडीने उडवले

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा मुद्दा पत्रकारांनी विचारला असता शिंदे गटाच्या आमदारांनी अशा थराला पोहोचायला नको. हा प्रकार दुर्दैवी आहे. शिंदे गटाच्या आमदारांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांनी ही कृती केली असावी. जेव्हा मुद्दे संपतात तेव्हा विरोधक गुद्दयावर येतात. आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघात आले याची भीती बंडखोर आमदारांच्या मनात असल्यामुळे दहशत पसरवणे, त्यांच्यावर दगडफेक करणे, असा प्रकार केला आहे. ही नाकर्तेपणाची भूमिका असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

वरळीतील रिकाम्या खुर्च्यावरुनही टीका

मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. हे जनाधार नसणारं सरकार आहे. अनेक ठिकाणी सरकारमधील नेत्यांच्या सभा होतात. त्यावेळी खुर्च्या रिकाम्या असतात आणि नेते मात्र बोलत राहतात. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वरळीची सभा महाराष्ट्रात व्हायरल झाली. मुख्यमंत्री बोलत आहेत आणि खुर्च्यांवर माणसेच नाहीत. यातून आज काय परिस्थिती आहे, हे स्पष्टपणे महाराष्ट्रापुढे आले, अशीही टीका जयंत पाटील यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नेहमी पाच आठवड्यांचे असते मात्र आताच्या अधिवेशनात फक्त १७ दिवसांचे कामकाज होणार आहे. या अधिवेशनामध्ये सदस्यांना अधिक चर्चा करायला आणि काही गोष्टी विस्तारीतपणे मांडता याव्यात, असा ठराव आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.