scorecardresearch

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून पुत्राचा कारभार ; छायाचित्र प्रसिद्ध करून राष्ट्रवादीची टीका

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी  श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले छायाचित्र प्रसिद्ध केले.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून पुत्राचा कारभार ; छायाचित्र प्रसिद्ध करून राष्ट्रवादीची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून कामकाज करीत असल्याचे छायाचित्र

मुंबई  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून कामकाज करीत असल्याचे छायाचित्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आल्याने सारवासारव करण्याची वेळ खासदार शिंदे यांच्यावर आली. ‘खासदार श्रीकांत शिंदे हे सुपर मुख्यमंत्री झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू.  हा कोणता राजधर्म आणि असा कसा हा धर्मवीर?’ अशा आशयाचे ट्वीट करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी  श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले छायाचित्र प्रसिद्ध केले. या छायाचित्रानंतर त्याची राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटली.

शासकीय कार्यालय वा खासगी निवासस्थान असो, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून लोकांना भेटणे चुकीचेच असल्याचे वरपे यांनी म्हटले आहे.

ते घरातील कार्यालय- श्रीकांत शिंदे

ठाणे : प्रसारित करण्यात आलेले ते छायाचित्र मंत्रालय किंवा वर्षां निवासस्थानामधील नसून ते आमच्या घरातील कार्यालयामधील आहे. याच कार्यालयातून मुख्यमंत्री आणि मी नागरिकांच्या समस्या सोडवित असतो. मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन बैठक असल्यामुळे अधिकाऱ्यांनी याठिकाणी तात्पुरती व्यवस्था म्हणून फलक ठेवण्यात आला होता. पण या गोष्टी फुगवून ते शासकीय निवासस्थान, मुख्यमंत्र्यांची खुर्ची असल्याचं सांगितले जात आहे, असे स्पष्टीकरण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी दिले. तसेच मी दोन वेळा खासदार म्हणून निवडुण आलो आहे आणि मला माहिती आहे की कुठे बसायचे आणि कुठे बसायचे नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना यावेळी लगावला. मुख्यमंत्री १२ ते १८ तास काम करतात. त्यामुळे त्यांचा कारभार कोणाला पाहण्याची वेळ येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठीतील सर्व मुंबई न्यूज ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp viral photo of eknath shinde mp son shrikant shinde sitting on cm chair zws

ताज्या बातम्या