मुंबई : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मुंबईच्या वेशीवरच रोखण्यात शुक्रवारी पोलिसांना यश आले खरे, मात्र या कारवाईमुळे ठाण्यासह नवीमुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या असंख्य प्रवाशांना बसला.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) गुन्हा नोंदवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:च ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर होणार, अशी घोषणा केली. ईडी कार्यालयाजवळ येऊ नका, जमू नका हे त्यांचे आवाहन झुगारून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने गोळा होतील, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या शक्यतेने गुरुवार रात्रीपासूनच मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या. दक्षिण मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणी पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. ईडी कार्यालयाच्या परिसरात सुमारे एक हजार पोलीस अधिकारी, अंमलदारांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, चर्चगेट स्थानकापासून ईडी कार्यालयापर्यंतच्या मार्गावर थोडय़ा थोडय़ा अंतरावर पोलीस बंदोबस्त होता. प्रमुख राजकीय पुढारी, पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानीही बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राज्यातून मुंबईकडे येण्याच्या प्रयत्नात असलेल्या पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना वाशी, ऐरोली, मुंलुंड, दहिसर येथील टोलनाक्याांआधीच रोखण्यासाठी व्यूहरचना आखली गेली. त्यानुसार शुक्रवारी पहाटेपासून टोल नाक्यांआधीच राष्ट्रवादीचे चिन्ह, झेंडा लावून शहरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत असलेले प्रत्येक वाहन रोखण्यात आले. या झाडाझडतीतून एखादे वाहन सुटलेच तर ते ईडी कार्यालयापर्यंत पोहचू नये, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. परिणामी सकाळी घाईच्या वेळेत ठाणे शहर, वाशी, ऐरोली आणि मीरारोड येथे वाहने खोळंबली.  ही कोंडी क्षणाक्षणाला वाढत गेली.

दुपापर्यंत ईडी कार्यालयामागील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली. मात्र ती पोलिसांच्या नियंत्रणात होती. जमावाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी अलीकडेच विकत घेतलेल्या बोलक्या ड्रोनचा वापर केला गेला. हा ड्रोन ठरावीक उंचीवरून हे मुंबई पोलीस दल आहे, येथे जमावबंदी लागू आहे, कायदा हाती घेऊ नका, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका, अशा सूचना देत होता आणि सर्वाचे लक्षही वेधून घेत होता. प्रदेश कार्यालयाबाहेर पदाधिकारी-कार्यकर्ते सरकारविरोधी घोषणाबाजी करत होते. दुपारी दीडच्या सुमारास पवार यांनी ईडी कार्यालयात येण्याचा निर्णय तहकूब केला. तो संदेश मिळताच पोलीस बंदोबस्तही शिथिल झाला आणि कार्यकर्तेही पांगण्यास सुरुवात झाली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार टोलनाक्यांवर वाहने अडवली नसती तर त्याचा भलताच परिणाम मुंबई शहरात झाला असता.