मुंबई : राष्ट्रीय चाचणी कक्षाने वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल जाहीर केला असून देशात राजस्थानचा महेश कुमार पहिला आला आहे. गुणवत्ता यादीत दुसरे स्थान मध्यप्रदेशमधील उत्कर्ष अवधीय याने पटकावले असून महाराष्ट्रातील कृष्णांग जोशी तिसऱ्या स्थानी आहे.
वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि वैद्यकीय पूरक अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय चाचणी कक्षाकडून (एनटीए) नीट घेतली जाते. यंदा ४ मे रोजी देशातील आणि विदेशातील ५४६८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. परदेशात अबूधाबी, दुबई, बँकॉक, कोलंबो, दोहा, काठमांडू, कुआलालंपूर, कुवेत, लागोस, मनामा, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर या देशांमध्ये नीटचे परीक्षा केंद्र होते. इंग्रजीसह हिंदी, मराठी, आसामी, बंगाली, गुजराथी, कन्नड, मल्याळम, उडीया, पंजाबी, तामिळ, तेलगू, उर्दू अशा तेरा माध्यमांमध्ये नीट घेण्यात आली.
त्यासाठी देशभरातील २२ लाख ७६ हजार ६९ विद्यार्थ्यांनी नीटसाठी नोंदणी केली होती. त्यातील २२ लाख ९ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परदेशातील ९३९ विद्यार्थ्यांनी तर भारतीय परंतु परदेशी राहणाऱया १६०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा ११ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ३६ हजार ५३१ विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
परीक्षेचा निकाल, गुणवत्ता यादी https://neet.nta.nic.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल.