मुंबई : गेल्या तीन – चार दिवसांपासून गोलफादेवी मार्गावर दोन ठिकाणी जलवाहिनी फुटली असून जलवाहिनीतून होत असलेली गळती रोखण्यात महापालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे आतापर्यंत हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. कोळीवाड्यातील अनेक घरांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असून आता पाण्याचा अपव्यय होत असल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत.
मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच सातत्याने कुठे ना कुठे जलवाहिनी फुटण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. झोपडपट्टी भागात फुटलेल्या जलवाहिन्यांमधून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जाते. सुमारे चार दिवसांपूर्वी गोलफादेवी येथील साईबाबा मंदिर आणि वारस लेन या ठिकाणी जलवाहिनीतून गळती होऊ लागली. रहिवाशांनी त्याबाबत महानगरपालिकेला माहिती दिली. महापालिकेच्या जलअभियंता विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र, जलवाहिनीची दुरुस्ती करता आली नाही. त्यानंतरही दोन – तीन वेळा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गळती रोखण्याचा प्रयत्न केला. या भागात सकाळी ७ ते ११.३० या कालावधीत पाणीपुरवठा होतो. जलवाहिनी फुटल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कोळीवाड्यातील काही भागात पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र जलवाहिनीच्या दुरुस्तीत दिरंगाई होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी चेतन पाटील याने केला. महापालिकेने तातडीने गळती रोखून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याबाबात महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.
